Type Here to Get Search Results !

वणीची निवडणूक रणधुमाळी चरमसीमेवर; पायल तोडसाम यांचा विकासदृष्टिकोन ठरला केंद्रबिंदू

वणी :

          नगरपरिषद निवडणूक 2025 आपल्या निर्णायक टप्प्यात पोहोचली असून आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे. शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु. पायल यशवंत तोडसाम यांनी अधिक आक्रमक, ठाम आणि जनतेला भिडणाऱ्या भाषेत आपला विकासनिश्चय जाहीर करून वातावरणात खडबड उडवली आहे.

              “हे वचन नाही… ही जबाबदारी आहे,” या थेट संदेशाने त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत समर्थकांमध्ये प्रचंड उर्जा निर्माण केली.

              शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या समस्यांवर त्यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी, शहरातील व्यापारी संकुलातील अव्यवस्था, मार्केट आणि फळ-भाजी मार्केटचे गोंधळात चालणारे व्यवस्थापन, पार्किंगची तीव्र समस्या, महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ प्रसाधनगृहांचा अभाव, तसेच तलाव परिसराचे होत असलेले विद्रुपीकरण—या सर्वावर “आता तडजोड नाही” असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.

                शहरातील गजबजलेल्या मार्केट, फळ-भाजी मार्केट चे नियोजनबद्ध पुनर्रचना करून आधुनिक आणि स्वच्छ स्वरूप देणे हा त्यांचा मुख्य मुद्दा ठरला. तर शैक्षणिक क्षेत्रात नगरपरिषद शाळांचे डिजिटल रूपांतर, ई-लर्निंग सुविधा, आधुनिक वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची हमी त्यांनी दिली.

         जनतेच्या तक्रारी वेळेत आणि ठोसपणे निकाली निघाव्यात यासाठी प्रत्येक प्रभागात चार तक्रार निवारण केंद्रे उभारण्याचा नावीन्यपूर्ण प्रस्ताव त्यांनी मांडला. “नागरिकांनी ऑफिसात धावाधाव न करता, व्यवस्था स्वयं नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे,” असे सांगत त्यांनी प्रशासकीय उत्तरदायित्वाचे नवे स्वरूप समोर ठेवले.

           अंतिम दिवशी उमटलेल्या मोठ्या गर्दीमुळे आणि तीव्र प्रचाराने निवडणुकीची चुरस चरमसीमेवर पोहोचली आहे. पायल तोडसाम यांनी मांडलेल्या आक्रमक विकास आराखड्यामुळे शहरातील राजकीय चर्चा अधिक तीव्र होत असून पुढील काही तास वणीच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad