निवडणुकीच्या उमाळ्याने पेटून उठलेल्या वणी शहरावर आज एका आदेशाने जणू वीज कोसळली. राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेल्या निर्देशांनुसार प्रभाग क्र. 14 मधील जागा “क” येथील निवडणूक थेट पुढे ढकलण्यात आली. न्यायालयीन अपीलाचा निकाल नुकताच लागल्याने उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी योग्य अवधी मिळावा, हा या निर्णयामागचा मुख्य आधार. परंतु राजकीय क्षेत्रात मात्र या निर्णयामुळे मोठी धडकी भरली आहे.
निवडणुकीच्या रणसंग्रामात शेवटच्या क्षणी आलेला हा धक्का उमेदवार आणि मतदार दोघांनाही अस्वस्थ करून गेला आहे. याउलट, नगराध्यक्ष पद, प्रभाग 1 ते 13 मधील सर्व जागा, तसेच प्रभाग 14 मधील “अ” आणि “ब” या दोन्ही जागांची निवडणूक मात्र पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसारच होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी स्पष्ट केले आहे.
“ठरलेल्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही”, या त्यांच्या निवेदनाने उर्वरित प्रभागांतील प्रक्रिया सुरळीत राहणार असल्याची खात्री वाढली असली, तरी “क” जागेवरील निर्णयाने शहरातील चर्चा अधिक तापल्या आहेत. शहरात निवडणूक उत्साह ओसंडून वाहत असताना एका जागेच्या स्थगितीने निर्माण झालेली भावनिक खळबळ सध्या तरी कमी होताना दिसत नाही.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या