शहरात २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास सराफा व्यापारी संजय निळकंठ कोंडावार (वय ७४) यांच्या राहत्या घरी चार अज्ञात इसमांनी दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली. दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षक व व्यापाऱ्यास चाकूचा धाक दाखवून मारहाण केली व सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एकूण १२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. या प्रकरणी फिर्यादीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३३१(६), ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे यवतमाळ येथील गोधणी कोठा येथील रहिवासी सागर बजरंग धोंगडे (वय ३४) याला उमरसरा रोडवरील शिवभोजन केंद्र परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वैशाली संजय वाघमारे (वय ४५, रा. न्यू नरसाळा, नागपूर) हिच्या मदतीने व इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून
₹६५,८३५ रोख,
₹११,८७,००० किमतीचे सोन्याचे दागिने,
तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व दोन मोबाईल फोन्स असा एकूण ₹१३,२२,८३५ चा मुद्देमाल जप्त केला.
त्यानंतर वैशाली वाघमारे तसेच ऋतोक लीलाधर गेडाम (वय २१, रा. विठ्ठलवाडी, यवतमाळ) यांना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित चार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या