राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाला थेट आदेश देत निकालांची संपूर्ण प्रक्रिया बदलून टाकली आहे. मतदान झालेल्या या निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होणार होते; मात्र न्यायालयाने सर्व निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाने नुकतेच काही नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. अशा परिस्थितीत आज मतदान सुरू असताना न्यायालयाचा हस्तक्षेप हा आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले की उद्या जाहीर होणारे निकाल इतर सुरू असलेल्या निवडणुकांवर प्रभाव पाडू शकतात आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येऊ शकते.
त्याचबरोबर न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम लागू राहील, असा कठोर आदेश दिला आहे. कोणत्याही माध्यमातून एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यावर संपूर्ण बंदी राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीदरम्यान जनमताचा अपप्रचार किंवा वातावरणनिर्मिती होण्याची शक्यता टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे न्यायालयाने नमूद केले.
निकाल पुढे ढकलण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने निवडणूक पूर्णपणे पारदर्शक राहावी, कोणत्याही पक्षाला अनुचित लाभ मिळू नये आणि पुढील निवडणुकीच्या प्रक्रियेवर निकालांचा प्रतिकूल परिणाम होऊ नये, यावर भर दिला. त्यामुळेच सर्व निकाल २१ डिसेंबरला एकत्र जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या