वणी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला आणखी बळकटी मिळाली आहे. काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या काल झालेल्या संयुक्त बैठकीनंतर आज भीम आर्मीने देखील महाविकास आघाडीसोबत एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
ही घोषणा भीम आर्मीचे विधानसभा अध्यक्ष बबलु मेश्राम व तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांची वणीतील स्थानिक विश्रामगृहात घेतलेल्या भेटीदरम्यान केली. या भेटीत रॉकाप तालुकाउपाध्यक्ष महेंद्र चांदोरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.
काल माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या स्वरूपात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज भीम आर्मीने आघाडीत सामील होताच वणी शहरातील निवडणुकीचे चित्र अधिकच रंगतदार झाले आहे. भीम आर्मीची संघटनात्मक ताकद वणी शहर व परिसरात चांगली असल्याने, त्यांचा सहभाग महाविकास आघाडीला निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर म्हणाले, “भीम आर्मीच्या सहभागामुळे सामाजिक न्याय आणि समावेशकतेचा संदेश अधिक दृढ होईल. महाविकास आघाडी आता अधिक मजबूत झाली आहे. ”नगराध्यक्षपद यंदा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने, उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून यासाठी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या या एकजुटीमुळे वणी नगर परिषदेची निवडणूक अधिक चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या