Type Here to Get Search Results !

‘ऑपरेशन शोध’ला मोठे यश – यवतमाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी गजाआड!

वणी :

           जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन शोध’ मोहिमेअंतर्गत यवतमाळ पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. मारेगाव पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या अल्पवयीनांच्या अपहरणप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी केवळ काही दिवसांत गजाआड करत तिन्ही अल्पवयीन मुलामुलींची सुरक्षित सुटका केली आहे.

          मिळालेल्या माहितीनुसार, मारेगाव पोलिस ठाण्यात अपराध क्र. ३०९/२०२५, कलम १३७(२) भा.द.वि. अंतर्गत तीन अल्पवयीनांच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. ३ नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी देविदास अंगादास वावरे (वय ४४, रा. अज्ञात) याला किनगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथून अटक केली.

           पथकाने आरोपीच्या ताब्यातून तिन्ही अल्पवयीनांची सुरक्षित सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले, ही बाब समाजासाठी दिलासादायक ठरली आहे. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, तपास पो.उ.नि. प्रविण सुळे करीत आहेत.

            तपासादरम्यान आरोपी वावरे याच्यावर तेलंगणातील आदिलाबाद टाउन, आदिलाबाद ग्रामीण तसेच नागपूरमधील अंबाझरी पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे.

           ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश दळवे (वणी), यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्थानीय गुन्हे शाखा, यवतमाळ) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सपोनि. दत्ता पेंडकर, पो.उ.नि. धनराज हाके, पोहवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, पोका सलमान शेख, रजनीकांत मडावी आणि चालक नरेश राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली.

        यवतमाळ पोलिसांच्या या तत्पर व समन्वित कारवाईमुळे ‘ऑपरेशन शोध’ मोहिमेला यश मिळाले असून, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad