वणी-घुग्घुस रोडवरील जन्नत हॉटेलजवळ कारला एका ट्रकने जबर धडक दिली. आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसराला हादरवून टाकले आहे. या अपघातात कारमधील तिघा मुलींचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेले रियाज शेख (55, भीमनगर, वणी) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी दुपारी समोर आली. त्यांची भावाची लहान मुलगी अजूनही गंभीर असून तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील चार जीव एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेले.
रियाज शेख हे वणीतील लाल पुलिया परिसरात गॅरेज चालवतात. सुटीच्या दिवशी त्यांनी आपल्या मुलीला कार चालवायला शिकवण्याचा निर्णय घेतला होता. आज सकाळी त्यांनी स्कोडा या कारमध्ये तीन मुली तसेच भावाची चार वर्षांची मुलगी यांना घेऊन घुग्घुस रोडवर कार चालवण्यासाठी नेले होते.
या अपघाताने भीमनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. एक प्रेमळ वडील आणि तीन लेकरं — क्षणात सर्व काही संपल. “काळाने एका बापाला त्याची तीन लेकरं हिरावून घेतली आणि शेवटी त्यालाही गाठलं…” अशी हळहळ व्यक्त होत आहे.
हा अपघात केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा हृदयद्रावक क्षण ठरला आहे. आज वणीने एक प्रेमळ पिता आणि तीन कोवळ्या जीवांना कायमचे गमावले. “नियतीसमोर माणूस किती असहाय आहे” याचं जिवंत उदाहरण ठरलेला हा अपघात सर्वांना चटका लावून गेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या