या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. उमेदवारांना १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्ज छाननीनंतर २६ नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्हांसह अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
मतदानाची प्रक्रिया २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडेल, तर मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होईल. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या निवडणुकीत एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार सहभागी होणार असून, १३ हजार ३५५ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
या निवडणुकीत व्हीव्हीपॅट (VVPAT) प्रणालीचा वापर होणार नाही. तथापि, पारदर्शकता आणि सुरक्षिततेसाठी प्रत्येक मतदार केंद्रावर सीसीटीव्ही देखरेखीची सोय केली जाणार आहे. मतदारांना सुविधा म्हणून ऑनलाइन व मोबाईल अॅपद्वारे मतदारयादी, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती मिळवता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायती, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येऊ शकतात.
दरम्यान, निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चमर्यादा निश्चित केली असून, प्रचारासाठी आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी तयार करण्यास आणि प्रचारयंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात या निवडणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात असून, स्थानिक स्तरावरील सत्तेची समीकरणे यामुळे ठरणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या