कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तातडीच्या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी काँग्रेसतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सीसीआय कापूस खरेदी नोंदणीसाठी तात्काळ मुदतवाढ द्यावी, मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, तसेच नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात देण्यात आले. दुपारी सुमारे 12 वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी तहसिल कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली आणि नंतर अधिकृतरित्या निवेदन सादर केले.
आपल्या भागात कापूस आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांचे मुख्य पिक आहे. पण शासनाच्या धीम्या गतीमुळे आणि ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहतात. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तात्काळ निर्णय घेतला पाहिजे; अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल,”
— संजय खाडे, प्रदेश सचिव, काँग्रेस पार्टी
हंगाम 2025-26 मधील कापूस खरेदी केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार सीसीआयमार्फत कार्यरत राहणार आहे. मात्र सध्या खरेदी नोंदणीची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 निश्चित आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल किंवा इंटरनेटची सोय नसल्याने ऑनलाइन नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. तसेच मार्डी परिसरात सीसीआय खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरु नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात अत्यल्प दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, राजू अंकतवार, प्रफुल्ल उपरे, प्रमोद वासेकर, प्रमोद लोणारे, सुधीर खंडाळकर, कैलास पचारे, पलाश बोंडे, महादेव पडोळे, एस. पेंदोर, विप्लव तेलतुंबडे, प्रेमनाथ मंगाम, अनंता डंभारे, नरेंद्र चिकटे, दिनेश पाहुनकर, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या