वणी :
कोणतीही सासू ही प्रथम स्त्री असते. तिला सून म्हणून सासू सोबत आलेल्या अनुभवाच्या आधारे ती आपल्या सुने सोबत वागण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रत्येक सुनेने सासू समजून घेताना प्रथम तिच्यातील स्त्री समजून घ्यावी असे आवाहन वैद्य सुवर्णा चरपे यांनी केले. त्या जागतिक महिला दिनानिमित्त नगर वाचनालय वणी व विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "सासू समजून घेताना" या विषयावर बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्यां भारतीताई सरपटवार या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार हे होते.
एका स्त्रीच्या आयुष्यात ती रजस्वला झाल्यापासून तर सासू होई पर्यंतचे होत जाणारे जीव रासायनिक बदल, मनोकायिक झिज उत्पन्न करतात. ते बदल तिच्या उपजत प्रकृतीनुसार काया, वाचा, शुद्धी, बुद्धीला प्रभावित करतात . जन्मल्यापासूनची ती व सासू झालेली तिच्या स्वभावात जमिन अस्मानाची तफावत असते. तीला तिच्या या जीवन प्रवासा दरम्यानच्या निसर्ग नियमनुसार झालेल्या मनोकायिक झिजेसह समजून स्विकारायला हवे. सासू ही घरातील प्रत्येक सदस्याची आद्यगुरू आहे व तिचा शेवटपर्यंत आदरच व्हायला हवा, असे प्रतिपादन वैद्य. चरपे यांनी केले.
अध्यक्षीय भाषण करताना भारती सरपटवार यांनी स्त्रीच्या आयुष्यातील शारीरिक दुखणी ,भावनिक खाचखडगे व तिच्या कर्तव्यांचा आढावा घेतला. वैयक्तीक आयुष्यातील दाखले देत स्त्रीपुरूषांनी एकमेकांना कशी साथ द्यायची ते खुमासदार शैलीत व्यक्त केले.
नगर परिषद शाळा क्र. 7 च्या विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषेत स्वागतगीत तसेच स्त्री जीवनात आधारित आदरयुक्त गीतावर नृत्य सादर केले. स्नेहलता चुंबळे यांनी स्त्रीयांना उद्देशुन "तु घे भरारी "हे गीत प्रस्तुत केले. इयत्ता सातवीची विद्यार्थिनी मैथिली अवताडे हिने स्त्री महात्म्य वर्णन करणारी स्फुर्तीदायक काव्य सादर करुन सभागृहाची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव सरपटवार यांनी अत्यंत अभ्यासू शब्दात कुशलतेने केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक अर्जुन उरकुडे यांनी केले. वणी नगर वाचनालयाला यावर्षी जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचनालय म्हणुन पुरस्कृत करण्यात आले आहे. त्याबद्दल सरपटवार दांपत्यांकडुन उत्कृष्ठ ग्रंथपाल म्हणून देवेंद्र भाजीपाले यांचा ग्रंथ भेट देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे, राम मेंगावार, सुनीता राठोड यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या