येथील सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. वाचनालयाचे माजी अध्यक्ष माधवराव सरपटवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सन 1874 मध्ये इंग्रज काळात स्थापन झालेल्या या ‘अ’ वर्ग वाचनालयाकडे सध्या 27 हजारांहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रे व नियतकालिके वाचकांसाठी येथे नियमित उपलब्ध असतात. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम, वक्तृत्व कार्यक्रम तसेच नवोदित आणि मान्यताप्राप्त वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य वाचनालय सातत्याने करत आहे.
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाममात्र वर्गणीमध्ये विशेष संदर्भ ग्रंथांची सुविधा देण्यात येते. दररोज 40 ते 50 विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत. तसेच दिवाळी अंकांची सोयही अल्प शुल्कात वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या वाचनालयाच्या विकासासाठी प्राचार्य राम शेवाळकर, स्वातंत्र्यसैनिक नानाजी भागवत, रतनलालजी जयस्वाल, डॉ. दिनकर मंगदे, माधवराव सरपटवार यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच संस्थेला वैभव प्राप्त झाले आहे.
नव्या अध्यक्षपदाचा कार्यभार 7 डिसेंबर रोजी संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वीकारला. यावेळी उपाध्यक्ष विशाल झाडे, सचिव गजानन कासावार, संचालक हरिहर भागवत, प्राची पाथ्रडकर तसेच वाचनालयाचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या