वणी, शुभम कडू : ग्रामीण भागातील खेळाडू हे शेतात काम करून उरलेला वेळ आपली छंद जोपासण्यासाठी करीत आहे, ही एक आनंदाची बाब आहे. अलिकडच्या काळात ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात खेळांच्या स्पर्धा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे. स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे, असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले. बोरगाव प्रिमियर लीगच्या बक्षिस वितरण सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. रविवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी बक्षिस वितरण सोहळा झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळ बोरगाव (मे) तर्फे या लीगचे आयोजन करण्यात आले होते.
बजरंग वॉरिअर्स व 11 स्टार संघात अंतिम सामना
बुधवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी बोरगाव प्रिमियर लीगचे थाटात उद्घाटन झाले. या स्पर्धेत 6 संघ सहभागी झाले होते तसेच बोरगाव व परिसरातील 22 गावातील खेळाडू या संघात सहभागी झाले होते. अंतिम सामना हा बजरंग वॉरिअर्स व 11 स्टार संघात खेळला गेला. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला.
प्रथम फलंदाजी करत 11 स्टार संघाने 10 ओव्हरमध्ये 99 रन्स काढले. या सामन्यात आशिष बोबडे यांने धडाकेबाज 64 रन्सची खेळी केली. 100 रन्सचे टारगेट बजरंग वॉरिअर्सने 9.3 ओव्हरमध्ये पूर्ण करीत 7 विकेट व 3 चेंडू राखून विजय मिळवला. बजरंग वॉरिअर्सतर्फे लोकेश पाचभाई यांनी 32 रन्स तर सूरज बोरसरे 23 रन्सची संयमी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.
स्पर्धेतील विजेता संघाला 35 हजार रुपये रोख, तर उपविजेत्या संघाला 25 हजार रुपये रोख बक्षिस देण्यात आले. लीगमध्ये बेस्ट बॅस्टमन हा 11 स्टार संघाचा आशिष बोबडे ठरला. बेस्ट बॉलर हा छत्रपति वॉरिअर्सचा प्रीतम ढवस ठरला, बेस्ट फिल्डर तुकाराम वासेकर (माही योद्धा) तर मॅन ऑफ दी सिरिज 11 स्टार संघाचा डॉ. दीपंकर बिस्वास ठरला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राहूल घुगुल यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे शिवराम चिडे, उमेश शेंडे, गणेश बलकी, लखन गेडाम, गौरव महाकुकर यांच्यासह बोरगाव येथील खेळाडू व समस्त गावक-यांनी परिश्रम घेतले.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या