श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी (र. क्र. ११४२) यांच्या वरोरा (जि. चंद्रपूर) शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी स्व. दादासाहेब देवतळे सभागृह, वरोरा येथे सभासद मेळावा उत्साहात पार पडला.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांनी भूषविले, तर उद्घाटक प्रा. कवडूजी नगराळे, माजी उपप्राचार्य, सहकार प्रशिक्षण केंद्र, अकोला होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, स्थानिक संचालक परिक्षीत एकरे, संपूर्ण संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे उपस्थित होते. मेळाव्याची सुरुवात उपाध्यक्ष श्री विवेकानंद मांडवकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर संचालक श्री परिक्षीत एकरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. कवडूजी नगराळे यांनी सहकार चळवळीचे महत्त्व स्पष्ट करत सभासदांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात ॲड. देविदास काळे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सभासदांना संस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “सभासद हा संस्थेचा मालक असला तरी घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमित आणि मुदतीत करणे हे त्याचे कर्तव्य आहे. ”संस्थेचे कार्य प्रशंसनीय असून संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली संस्था सातत्याने प्रगती करत आहे. सध्या संस्थेचे ८७,०७५ सभासद, ठेवी ८१८ कोटी ९६ लाख, कर्जवाटप ४७७ कोटी आणि नफा २ कोटी ९७ लाख इतका झाला आहे. संस्थेच्या मुख्य शाखेसह २२ शाखा महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत.
मेळाव्यात संस्थेचे उत्कृष्ट ठेवीदार, उत्कृष्ट कर्जदार, उत्कृष्ट कर्मचारी, तसेच उत्कृष्ट दैनिक ठेव अभिकर्ता यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या