Type Here to Get Search Results !

वणी नगरपरिषद निवडणुकीत रंगत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भव्य सभा

वणी :

         आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. निवडणुकीतील प्रचाराला वेग देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले असून, ही सभा शासकीय मैदानावर होणार आहे.

            या सभेचे आयोजन जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने भव्य स्वरूपात करण्यात आले आहे. तयारीसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या असून सभास्थळी आकर्षक व्यासपीठ, ध्वनीप्रणाली आणि प्रचार साहित्याची सजावट करण्यात येत आहे.

              शिंदे यांच्या आगमनामुळे वणी शहरात वाढत्या राजकीय हालचालींचा माहोल तयार झाला आहे. सकाळपासूनच शहरभर बॅनर, फ्लेक्स आणि स्वागत कमानी लावण्यात आल्या असून विविध मंडळे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खास उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

             सभेत नगरपरिषदेच्या निवडणूक रणधुमाळीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिक पातळीवर पक्षाच्या उमेदवारांसाठी ही सभा बळ देणारी ठरणार आहे. दुसरीकडे प्रतिस्पर्धी गटही आपापला प्रचार वाढवित असल्याने वणीतील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होत आहे.

              स्थानिक मतदारही या सभेकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत असून, शिंदे कोणत्या विकासकामांना गती देणार आणि शहरासाठी कोणत्या नव्या घोषणा करतील याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad