तालुका विधी सेवा समिती वणी तसेच लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन व साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश पी. एस. जोंधळे (वरिष्ठ स्तर, वणी), एन. बी. बिरादार (न्याय दंडाधिकारी, प्रथम श्रेणी), सरकारी वकील माधुरी वायचाळ, सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट रेखा तेलंग, ऍडव्होकेट पूजा मत्ते, ऍडव्होकेट धनंजय आसुटकर, ऍडव्होकेट दादा ठाकूर, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष डॉ. विजय राठोड, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे तसेच प्राचार्य चित्रा देशपांडे मंचावर उपस्थित होते.
शिबिरात न्यायाधीश पी. एस. जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याअंतर्गत असलेले हक्क, कर्तव्ये तसेच विविध विधी सेवा योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्याकडे लक्ष द्यावे, असा उपदेश त्यांनी केला.
याप्रसंगी ऍडव्होकेट धनंजय आसुटकर यांनी "कायद्याचे ज्ञान दारोदारी, अज्ञानाचा अंधकार दूर करी" या सूत्राचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना मादक पदार्थांचे दुष्परिणाम, त्यांच्यापासून होणारे सामाजिक व शारीरिक दुष्परिणाम तसेच कायदेशीर तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले. समाजात वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर युवकांनी दक्ष राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यानंतर ऍडव्होकेट पूजा मत्ते यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, ‘गुड टच – बॅड टच’, बालमजुरी, बालकांवरील अत्याचार, लैंगिक शोषण या गंभीर विषयांवर सविस्तर माहिती दिली. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होऊ शकते, याची जाणीव करून देत त्यांनी विद्यार्थ्यांना सावधगिरी, जागरूकता आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले.
तसेच ऍडव्होकेट दादा ठाकूर, ऍडव्होकेट रेखा तेलंग व सरकारी वकील माधुरी वायचाळ यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत कायदेविषयक शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक किरण बुजोणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील घाटे यांनी मानले. शिबिरास विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या