आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५’च्या औचित्याने श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वणी यांच्या वतीने दि. १२ ऑक्टोबर रोजी भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन हॉलमध्ये भव्य सदस्य मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक श्री. जे. के. ठाकूर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गणेश काळे, श्री. भवरकर, श्री. सुनील पांडे आणि श्री. सचिन गौरखेडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे होते.
मेळाव्यात सहकाराचे महत्त्व, संस्थेची प्रगती आणि भविष्यातील दिशा यावर सविस्तर चर्चा झाली. यवतमाळ जिल्हा सहकारी बोर्डाचे तज्ञ संचालक प्रा. कवडूजी नगराळे यांनी ‘सहकारातून समृद्धी’ या विषयावर मार्गदर्शन करत सहकाराची शक्ती आणि सामाजिक योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे संस्थेतील उत्कृष्ट ठेवीदार, कर्जदार, अभिकर्ते आणि शाखा व्यवस्थापकांचा गौरव सोहळा. त्यांच्या योगदानामुळे संस्थेच्या प्रगतीला गती मिळाल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. उपाध्यक्ष श्री. विवेकानंद मांडवकर यांनी प्रस्तावना सादर करत संस्थेचा प्रवास व उद्दिष्टे मांडली. संचालक श्री. परीक्षित एकरे यांनी मनोगत व्यक्त करत सभासदांचे आभार मानले, तर अध्यक्ष ॲड. काळे यांनी सहकारातून सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन ढोके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सुरेश बरडे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय दोरखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व्यवस्थापक प्रज्ञा टोंगे व सर्व कर्मचारीवर्गाने मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.
हा मेळावा ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला नवी ऊर्जा देणारा ठरला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या