मांगली मार्की खुली खदान परिसरातील बी. एस. इस्पात कंपनीविरोधात स्थानिक कामगारांचा रोष वाढला असून, जुन्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची आणि थकित भविष्य निर्वाह निधी (सी.आर.पी.एफ.) जमा करण्याची मागणी करत कामगारांनी कंपनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
या निवेदनाचे नेतृत्व वणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केले. त्यांच्यासोबत प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेल तालुकाध्यक्ष किशोर गोंलावार आणि वणी शहराध्यक्ष विनोद ठेंगणे उपस्थित होते. निवेदन कंपनीचे खान प्रबंधक सुभाष दास यांना देण्यात आले.
कामगारांनी निवेदनात नमूद केले आहे की, कंपनी मागील दीड वर्षांपासून बंद होती, त्या काळात स्थानिक कामगारांचा सी.आर.पी.एफ. निधी जमा करण्यात आलेला नाही. आता कंपनी पुन्हा सुरू झाली असली तरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
दिलीप भोयर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कंपनी प्रशासनाने पंधरा दिवसांच्या आत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर येत्या १० नोव्हेंबरपासून दुपारी १२ वाजता कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सर्व कामगार आमरण उपोषणास बसतील.
आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कंपनी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती आमदार संजय देरकर, उपविभागीय अधिकारी केळापूर, तहसीलदार झरी-जामणी आणि पोलिस निरीक्षक मुकुटबन यांना देण्यात आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या