“आम्हाला कोणी कमी लेखू नये... आता वणीकरांच्या पाठिशी शिवसेना ठाम उभी राहणार!” — अशा ठाम भूमिकेसह शिवसेना (शिंदे गट)ने वणी नगरपरिषद निवडणुकीत स्वबळावर उतरायचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “जिथे युती शक्य आहे तिथे करा, अन्यथा स्वबळाची तयारी ठेवा” या स्पष्ट संदेशानंतर वणीतील शिवसैनिकांनी रणशिंग फुंकले आहे.
शिवसेनेचे वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर व शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून हा निर्णय जाहीर केला. दोन्ही नेत्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की,
“वणीतील मित्रपक्ष भाजप आम्हाला विश्वासात न घेता निवडणुकीची तयारी करत आहे. मात्र आता आम्हीही वणीकर जनतेच्या पाठिंब्यावर आणि शिवसैनिकांच्या ताकदीवर नगरपरिषद जिंकण्यास सिद्ध आहोत!”
वणी शहरातील सर्व १४ प्रभागांचा बारकाईने आढावा घेत पक्षाने नगराध्यक्षपदासह सर्व २९ जागांसाठी उमेदवार तयार केले आहेत. पक्षाची निवडणूक रणनीती आखली गेली असून, “शिवसेनेचा झेंडा वणी नगरपरिषदेवर फडकवायचा” असा निर्धार कार्यकर्त्यांत दिसत आहे.
भाजपकडून संवादाचा अभाव आणि निर्णयप्रक्रियेत दुर्लक्ष होत असल्याचा सूर शिवसेना नेत्यांनी लावला आहे. त्यांनी स्पष्ट केले की,
“आमचे कार्यकर्ते अनेक वर्षे झटत आहेत. त्यांना न्याय मिळावा म्हणूनच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. वणीकर जनतेचा प्रतिसाद जबरदस्त आहे. त्यामुळे शिवसेना नगरपरिषदेवर आपला भगवा फडकवेल याची आम्हाला खात्री आहे.”
या निर्णयामुळे वणीतील राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसांत शहरातील वातावरण पूर्णपणे तापण्याची शक्यता आहे. शिवसेनेची आक्रमक तयारी आणि स्वबळाची घोषणा पाहता, या निवडणुकीत ‘सामना’ चुरशीचा होणार हे निश्चित झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या