Type Here to Get Search Results !

मनसेचा शहराध्यक्ष बनला 'ढोरकी', जनावरांना घेऊन थेट नगर पालिकेत

वणी : 

          शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि त्यामुळे वाढलेले अपघातांचे सत्र यामुळे नागरिक हैराण झाले असताना, या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  चांगलाच धडा शिकवला आहे. मनसेचे वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी आज (दिनांक २१ ऑगस्ट) रोजी अनोखे आणि अफलातून आंदोलन करत थेट 'ढोरकी'चा अवतार घेतला आणि शहरातील सर्व मोकाट जनावरे गोळा करून त्यांना चक्क नगर परिषदेच्या कार्यालयात नेऊन सोडून दिले. या अनपेक्षित हल्ल्याने नगर परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

          गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मनसेने वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देऊनही, त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर, प्रशासनाला त्यांच्या बेजबाबदारपणाची जाणीव करून देण्यासाठी मनसेने हे 'ढोरकी' आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.


'मनसे शहराध्यक्षाचा 'ढोरकी' अवतार; ढोल-ताशांच्या गजरात जनावरे थेट नगर परिषदेत.!

                     आज  शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी स्वतः गुराख्याचा पोशाख परिधान केला. त्यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे एकत्र केली. जनावरे हाकताना ढोल-ताशांचा गजर करत त्यांनी नगर परिषदेच्या दिशेने मोर्चा वळवला. अचानक जनावरांचा कळप आणि मागे मनसेचे कार्यकर्ते घोषणा देत येत असल्याचे पाहून नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी गोंधळून गेले.

            मनसे कार्यकर्त्यांनी नगर परिषद आवारात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. या अनोख्या आंदोलनाने प्रशासनावर दबाव वाढला आणि अखेर मुख्याधिकारी सचिन गाडे यांना स्वतः आंदोलनकर्त्यांशी भेटण्यासाठी बाहेर यावे लागले.


मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासक पाऊल; ५ दिवसात समस्या सोडवण्याचे आश्वासन.!

                  मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, शहरातील कोंडवाडे आणि उपलब्ध असलेल्या गोशाळांची क्षमता तपासणी करून पुढील पाच दिवसांत ही सर्व मोकाट जनावरे त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येतील. मुख्याधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले.

               या आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, धीरज पिदुरकर, शंकर पिंपळकर, मयुर गेडाम, मयुर घाटोळे, गोविंदराव थेरे, रमेश पेचे, लक्की सोमकुंवर, जुबेर खान, योगेश ताडम, हिरा गोहोकार, अहमद रंगरेज, अक्षय बोकडे, गौरव पुराणकर, सूरज पळसकर, वैभव पुराणकर, कृष्णा नीमसटकर, मनिषा नवघरे, हर्षल दांडेकर, कन्हैया पोद्दार, साहिल येरने, सूरज कोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मनसेच्या या 'ढोरकी' आंदोलनाने प्रशासनासह संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे आणि आता वणीकर प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहत आहेत.



                     यापुढे शहरातील मोकाट जनावरे, कुत्रे आणि डुकरे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आणून सोडू

               शहरातील मोकाट जनावरे, कुत्रे आणि डुकरांचा बंदोबस्त करावा यासाठी आम्ही नगर परिषदेला वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र मुख्याधिकारी या पत्रांना केराची टोपली दाखवत आहे. म्हणून आज अखेर आम्ही हे आंदोलन केले. जर यावर कुठलीही ठोस कारवाई न झाल्यास शहरातील सर्व मोकाट जनावर, कुत्रे आणि डुकरे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आणून सोडू. 

                – अंकुश बोढे 

              शहराध्यक्ष – मनसे, वणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad