Type Here to Get Search Results !

लायन्स स्कूल येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

वणी : 
          विदर्भातील सांस्कृतिक परंपरेचा एक अनोखा सण असलेला तान्हा पोळा रविनगर व देशमुखवाडी मधील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या सणाला २१७ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असून, शेतकरी आणि बैल यांच्या नात्याला सन्मान देणारा हा उत्सव लहान मुलांच्या आनंदासाठी विशेष प्रसिद्ध आहे. लायन्स स्कूलने यंदा या सणाला शालेय स्तरावर एक सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वरूप देत विद्यार्थ्यांना परंपरेची ओळख करून दिली.
         लायन्स स्कूलच्या प्रांगणात सकाळी १०:०० वाजता तान्हा पोळ्याच्या उत्सवाला प्रारंभ झाला. देशमुखवाडीमध्ये शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर प्राचार्य प्रशांत गोडे व रविनगरमध्ये पर्यवेक्षिका मनीषा कापसे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेनुसार, रंगीबेरंगी सजावट करून आणलेल्या लाकडी बैलांची पूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपल्या सजवलेल्या लाकडी बैलांना प्रदर्शनात सादर केले.
             या उत्सवात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये पारंपरिक लोकनृत्य गायत्री लुथडे आणि पूर्वा वाढई यांनी गीत सादर केले तर धारा गेडाम यांनी उत्स्फूर्त भाषण दिले.  रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले. लाकडी बैलांचे प्रदर्शन आणि तान्हा पोळ्याचा मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे लाकडी बैलांचे प्रदर्शन. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेने सजवलेल्या नंदी बैलांचे प्रदर्शनमध्ये इतर सजावटीच्या वस्तू व सामाजिक संदेश यांचा वापर करून त्यांना आकर्षक केले होते. 
         यावेळी शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर प्रा. प्रशांत गोडे  यांनी, “तान्हा पोळा हा सण आपल्या सांस्कृतिक वारसाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा उत्सव विद्यार्थ्यांना शेती आणि बैल यांच्या महत्त्वाची जाणीव करून देतो. यासोबतच, मुलांमध्ये सर्जनशीलता आणि सामूहिक कार्याची भावना वाढवण्यासही हा सण मदत करतो. आमच्या शाळेत हा उत्सव साजरा करून आम्ही विद्यार्थ्यांना आपल्या परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कार्यक्रमांतून समाजात ऐक्य, आपुलकी आणि संस्कृतीची मुळे अधिक घट्ट होतात." असे सांगीतले.

      विद्यार्थ्यांनी आपल्या लाकडी बैलांना सजवले आणि काही ठिकाणी त्यांना दक्षिणा म्हणून भेटवस्तू मिळाल्या. परंपरेचा इतिहास तान्हा पोळा हा सण विशेषतः विदर्भात साजरा केला जातो आणि याला २१७ वर्षांची परंपरा आहे. हा सण राजे रघुजी भोसले यांनी १८०६ मध्ये सुरू केला होता, ज्यामुळे लहान मुलांना बैलांचे आणि शेतीचे महत्त्व समजावे. या सणात लहान मुले लाकडी किंवा मातीच्या बैलांना सजवून घरोघरी फिरतात आणि दक्षिणा मिळवतात. हा उत्सव विदर्भातील सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. 
          या उत्सवाचा समारोप मुलांना प्रसाद वाटप केल्यानंतर पोळा फुटला असे जाहीर करून झाला. या कार्यक्रमाचे संचालन खुशी वानखेडे, पहेल चुरे यांनी केले. लायन्स स्कूलच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सण व उत्सव यांच्या प्रती प्रेम, सांस्कृतिक वारसा व जागरूकता निर्माण व्हावी आणि बैल पोळा व तान्हा पोळ्याच्या परंपरेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मागे होता असे मनोगत शिक्षकांनी व्यक्त केले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad