वणी :
सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ वणी-मारेगाव-झरी या संघाचा २ रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने साजरा केला. या वर्षीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संघाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ग्रंथालय कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
दुपारी ०२:०० वाजता ड्रीमलँड सिटी परिसरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुरेंद्र विधाते यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि ग्रंथालयाच्या सामाजिक योगदानाबद्दल माहिती दिली. “ग्रंथालय ही केवळ पुस्तकांचे भांडार नसून, समाजाला प्रबोधन आणि प्रेरणा देणारी वर्धिष्णू संस्था आहे,” असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. तसेच, वृक्षारोपणाच्या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले, “पर्यावरण संरक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. आम्ही ग्रंथालय कर्मचारी म्हणून समाजाला हा संदेश देण्यासाठी हा छोटासा पण महत्त्वपूर्ण पुढाकार घेत आहोत."
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला तो वृक्षारोपणाचा उपक्रम. ड्रीमलँड सिटी परिसरात आणि आजूबाजूच्या सार्वजनिक जागांवर एकूण १० झाडे लावण्यात आली. यामध्ये अशोक, नीम, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ यांसारख्या स्थानिक आणि पर्यावरणपूरक वृक्षांचा समावेश होता. कर्मचारी यांनी मिळून खड्डे खणणे, रोपे लावणे आणि त्यांना पाणी घालणे यासारखी कामे केली. या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथालय कर्मचारी संघाने ‘प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक वृक्ष’ ही संकल्पना मांडली. यामागील विचार असा की, ज्याप्रमाणे प्रत्येक पुस्तकातून ज्ञानाचा प्रसार होतो, त्याचप्रमाणे प्रत्येक झाडातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळते. यानिमित्ताने उपस्थितांना वृक्षारोपण आणि त्यांच्या संगोपनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त ग्रंथालय कर्मचारी संघाने गेल्या वर्षभरातील आपल्या कामाचा आढावा घेतला. संघटक गजानन कोकुडे यांनी कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करणार असून संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कोषाध्यक्ष शुभम कडू, सदस्य अमोल पेटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे सदस्य आणि सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथालय कर्मचारी संघाचे सचिव प्रमोद लोणारे यांनी सर्वांचे आभार मानले आणि यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.
ग्रंथालय कर्मचारी संघाने लावलेल्या प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. यासाठी स्वयंसेवकांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी झाडांना नियमित पाणी घालणे, खते देणे आणि त्यांचे संरक्षण याची काळजी घेईल. तसेच, पुढील वर्षी वर्धापन दिनानिमित्त ‘हरित ग्रंथालय’ ही संकल्पना राबवण्याचा मानस संघाचे सहसंघटक अरविंद दुधलकर यांनी केला आहे, ज्यामध्ये ग्रंथालय परिसराला पूर्णपणे पर्यावरणपूरक बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्रंथालय कर्मचारी संघाने केवळ आपले यश साजरे केले नाही, तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन समाजात प्रेरणा निर्माण केली. हा उपक्रम निश्चितच इतर संघटनेसाठी प्रेरणादायी ठरेल.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या