वणी :
लायन्स क्लब वणी आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने, लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, देशमुखवाडी वणी येथे भव्य निःशुल्क मुख कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात, नागपूरचे सुप्रसिध्द ओरल कैंसर रोग विशेषज्ञ डॉ. चंद्रशेखर बांडे, चंद्रपूरचे प्रसिध्द ओरल सर्जन डॉ. विजय उराडे तसेच विशेष सहभाग लायन डॉ. विजय राठोड, डॉ. रेशम शुगवानी, डॉ. रिषभ राठोड या तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली.
यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात जवळपास 70 हून अधिक रुग्णांनी नोंद करून आपली तपासणी करून घेतली. तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार याबाबत चित्रफिती द्वारे मार्गदर्शन केले आणि रुग्णांना मोफत औषधे दिली.
लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला यांनी मनोगत व्यक्त करतांना "कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती आणि लवकर निदान यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. या शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना मोफत तपासणी आणि मार्गदर्शन मिळाले. तसेच वणी येथील लायन्स क्लबने यापूर्वी अशा शिबिरांचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये शेकडो महिलांनी लाभ घेतला. तज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने हे शिबिर यशस्वी होतात. यामध्ये महिलांना मोफत किंवा कमी खर्चात वैद्यकीय तपासणी मिळते, आरोग्याविषयी जागरूकता वाढते, ग्रामीण भागातील महिलांना शहरातील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळते." असे सांगितले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब वणी आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या शिबिरात वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. लायन्स क्लब वणीने भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मानस यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.
शिबिराचे उद्घाटन लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला उपस्थित होते तर पाहुणे म्हणून सर्वस्वी लायन राजाभाऊ पाथ्रडकर, बलदेव खुंगर, सुधीर दामले, महेंद्र श्रीवास्तव, चंद्रकांत जोबनपुत्रा, रमेश बोहरा,पुरुषोत्तम खोब्रागडे,प्रा. अभिजीत अणे, मंजिरी दामले, वीणा खोब्रागडे, नंदलाल शुगवाणी, भिकामचंद गोयंनका, सचिन नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तज्ञ डॉक्टरांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रा.अभिजीत अणे यांनी केले तर श्री. महेंद्र श्रीवास्तव यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या