वणी :
वणी हा खनिज संपत्तीने संपन्न असलेला भूभाग आहे. या परिसरात कोळसा, लाईम स्टोन, डोलोमाइट, सिमेंटचे दगड विपुल प्रमाणावर आहे. देशाच्या दृष्टीने ही वरदान असले तरी या परिसरासाठी हा आता शाप असल्याची प्रचिती येत आहे. या परिसरातील खनिज संपत्तीमुळे वणी परिसर हा पूर्णपणे प्रदूषित शहर निर्माण झाल्याचे प्रतिपादन या विषयाचे अभ्यासक प्रा. प्रवीण सातपुते यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ वणी व नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने माझा गाव माझा वक्ता या मासिक व्याख्यानमालेचे 44 व पुष्प गुंफताना ते वणी परिसरातील प्रदूषण व निवारण या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के हे होते.
आपला विषय मांडताना सातपुते पुढे म्हणाले की, आज संपूर्ण जगाच्या पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर पर्यावरण परिषदांचे आयोजन करून ग्लोबल वॉर्मिग वर कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्या प्रकारे प्रभावी उपाययोजना वणी परिसरात करण्यात येत नाही. वणी परिसरातील खाणी मुळे शेतातील पिकांवर कोळशाच्या कणांचा थर साचतो. त्यामुळे पिकांची नासाडी होते. जमिनीचा पोत नष्ट झाली आहे. दूषित कण नाकातोंडा वाटे फुफ्फुसात जातो. त्यामुळे विविध आजार उद्भवत आहेत. वणी तालुक्याची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या नदीचे पाणी दूषित झाले आहे. परिसरातील घाण पाणी या नदीत सोडण्यात येत असल्याने पाणी दूषित झाले आहे. यासर्वांचा परिणाम म्हणजे येथील प्रत्येक व्यक्तीचे सरासरी आयुष्यमान 10 वर्षांनी कमी होत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. येथील प्रदूषण कमी करण्यावर शासन व खनीज उत्पादक कंपन्यांचा पुढाकार आवश्यक आहे. वृक्षारोपण करून ती जगविण्याची आवश्यकता आहे.
अध्यक्षीय भाषणातून कासावार यांनी परिसरातील प्रदूषणाची भयानकता मांडून यासाठी नदीची नांगरणी, नदीचे खोलीकरण करणे अशा प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ वणी चे सचिव अभिजित अणे यांनी केले. आभार प्रदर्शन गजानन भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या