Type Here to Get Search Results !

सत्यशोधक विवाहबंधनात १० जोडपे अडकले शिवापूर (बंदर )येथे आंतरजातीय सामूहिक सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न

प्रतिनिधि / कोरा (मंगेश राऊत) : 

                                      जातीपातीचा विरोध झुगारून विदर्भातील १० जोडपी एकत्रितरीत्या बंधनात अडकले. नेचर फाउंडेशन नागपूर यांच्यावतीने सामूहिक आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजन १८ मे २०२५ रोजी चिमूर तालुक्यातील शिवापूर बंदर येथे करण्यात आले होते. या सोहळ्यात लग्नासोबत ज्या जोडप्यांनी यापूर्वी आंतरजातीय विवाह केला आहे. अशा २२ जोडप्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला.

            वर्तमानातील २१ व्या शतकात सुद्धा लग्नव्यवस्थेच्या व्यवहारिक बंधनामुळे मनातला जोडीदार निवडणे व आयुष्यभरासाठी त्याच्याशी लग्नगाठ बांधणे म्हणजे असंख्य संकटांचा डोंगर चढण्यासारखेच आहे. समाज आणि कुटुंबातील लोकांच्या लग्न जोडण्याच्या व्यावहारिक पद्धतीमुळे आवडणाऱ्या व्यक्तीसोबत संसार थाटने प्रचंड अडचणीचेच आहे. अनेक व्यक्तींची मनधरणी करत विवाह जोडणे आणि त्यानंतर सुद्धा लग्न होतपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची आर्थिक, मानसिक व वैचारिक कुचुंबना सहन करणे, आजच्या पिढीला कितपत मान्य आहे हा संशोधनाचा विषय आहे. हीच घुसमट आज आयोजित केलेल्या आंतरजातीय सामूहिक सत्यशोधक विवाहात दिसून आली. तब्बल १० जोडप्यांनी जातीपातीचे बंधन झुगारून आंतरजातीय विवाहस तयारी दर्शवली व नव्या संसारिक आयुष्याची सुरुवात देखील केली. यामुळे त्यांच्या मनातील अव्यक्त घुसमटीची भावना जगासमोर व्यक्त झाली. ही किमया साधली नेचर फाउंडेशनचे सचिव निलेश नन्नावरे यांनी. 

            निलेश ननावरे आणि स्नेहा श्रीरामे यांचा सुद्धा आंतरजातीय प्रेम विवाह २०२३ मध्ये नोंदणी पद्धतीने संपन्न झाला होता. हे जोडपं सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तरुणांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. असंख्य युवक आणि युवतींशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या मनातील ही घुसमट ओळखली व त्यावर काहीतरी उपाय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इथूनच सामूहिक आंतरजातीय विवाह सोहळ्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. ही संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी त्यांनी १ वर्षापासूनच कार्यरत होते. आज झालेल्या सामूहिक सत्यशोधक विवाह सोहळ्यामुळे युवक आणि युवतींना एक हक्काचे व्यासपीठ मिळालेले आहे. याद्वारे ते हवे असलेल्या जोडीदारासोबत संसार थाटू शकतात.

           हा विवाह सोहळा महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज या पद्धतीने पार पडला. त्यामुळे अतिशय खर्चिक असलेल्या पारंपारिक पद्धतीने बाजूला सारून तर्कनिष्ठ, विवेकवादी व वैज्ञानिक पद्धतीने नवीन जोडप्यांनी वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. तब्बल १५०  वर्षानंतर सुद्धा महात्मा फुलेंच्या विचारांना प्रमाण मानून सामूहिक सत्यशोधक विवाह आयोजित करणे ही या परिसरातील प्रथमच बाब आहे. यामुळे या सोहळ्याने वैचारिक परिवर्तनाच्या क्रांतिकारक कृतीचा पायंडा रोवला आहे. याचा एक वेगळाच आनंद जोडप्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. 

      सर्व जोडप्यांनी प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच वंदन केले. त्यानंतर व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर सर्वांचा परिचय करून देण्यात आला. सत्यशोधक समाज चंद्रपूरचे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे व प्रा. माधव गुरूनुले यांनी उपस्थित पाहुण्यांना सत्यशोधक विवाहाचे महत्त्व व भूमिका पटवून दिली. त्या नंतर सत्यशोधक मंगलाष्टकाच्या माध्यमातून मंगलगीते गायली गेली. शेवटच्या मंगलाष्टका नंतर वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार अर्पण केले व सर्व वधूवरांना सत्यशोधक पद्धतीने शपथ देण्यात आली. त्यानंतर स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. अशा रीतीने अतिशय कमी खर्चामध्ये सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला.

       या विवाहाच्या प्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे, सत्यशोधक समाज चंद्रपूरचे ऍड. प्रशांत सोनूले, अरुणजी धानोरकर, कार्याध्यक्ष अविनाश आंबेकर, रजनीताई आंबेकर, पांडुरंग गावतुरे, वामनजी कावडे, पांडुरंग गावतुरे, तसेच ऍड. राहुल वासनिक, नरेश कुमार बोरीकर, अविनाश पोइनकर श्रीकांत एकुडे उपस्थित होते. 

       या कार्यक्रमाचे संचालन बादल श्रीरामे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विचारवेध पुणेचे अनिकेत साळवे त्रिवेणी साळवे,नेचर फाउंडेशनचे अमोल कावरे,आशिष जीवतोडे,मंगेश राऊत, प्रमोद शेंडे,  प्रदीप भुरे, वैभव तलमले, निशिगंधा गहाने, गुंजन सावसाकडे, रोहित पोटफोडे, शंकर मते ,निखिल मोडक, दिलीप गुडदे व  नेचर फाउंडेशनचे इतर सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image