वणी :
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार वणी नगर पालिकेद्वारा स्थानिक शिवतीर्थावर शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, तहसिलदार निखिल धुळधर, नायब तहसिलदार अशोक ब्राह्मणवाडे, रामचंद्र खिरेकर, वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय तेलतुंबडे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. नंतर महाराष्ट्रगीत घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविकातून या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांनी मांडली. त्यानंतर तेजस्विनी गव्हाणे हिच्या शिवगर्जनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नगर परिषद शाळा क्रमांक 7 चे विद्यार्थी सार्थक लाटकर व वैष्णवी सुदामा बघेल यांनी छ. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विचार व्यक्त केले. त्यानंतर दिगंबर ठाकरे या शिक्षकांनी शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला.
वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची देदीप्यमान कारकीर्द प्रस्तुत करून ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी संपूर्ण विश्वाला स्वराज्याचा आदर्श दिला. त्यांच्या राज्यात जनतेसोबतच स्त्रिया शेतकरी आणि सामान्य माणूस सुरक्षित होता. प्रगतीपथावर होता. आज छत्रपती शिवरायांच्या कार्याची नव्या समाज बांधणीसाठी गरज आहे.
अध्यक्षीय भाषण करताना संजय देरकर म्हणाले की, स्वराज्य कसं असावं याचा आदर्श श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान कारकिर्दितून दिसून येते. हा उत्सव मराठी माणसांचा उत्सव आहे. असे मत व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी वणी नगरपरिषद प्रशासनाची होती.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या