वणी :
जन्म व मृत्यू आपल्या हातात नसले तरी आपल्या वाट्याला आलेला काळ सकारात्मक दृष्टिकोनातून जगल्यास “जीवन हे सुंदर व अमूल्य आहे” असा प्रेरणादायी संदेश यवतमाळ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिला.
लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, वणी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेल्फ इंट्रोस्पेक्शन वर्कशॉप ऑन ‘लाईफ इज ब्युटीफूल अँड प्रेसिअस’ या कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार होते.
मार्गदर्शनात डॉ. गावंडे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाच्या जोरावर यशस्वी प्रगती करता येते, याचे उदाहरण म्हणून लाडखेड येथील सुमैया शेख हिची प्रेरणादायी कहाणी चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांसमोर मांडली. दोन्ही पायांचे अवयव नसतानाही व आर्थिक अडचणींवर मात करत तिने पदवी पूर्ण करून कलाकुसरीच्या वस्तू तयार करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
शारीरिक व्यंगापेक्षा मानसिक पंगुत्व माणसाला अधिक दुर्बल बनवते असे नमूद करत पालकांनी अपयश व संकटांचा सामना करण्यासाठी पाल्यांना प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनो, कोणालाही तुच्छ लेखू नका आणि स्वतःलाही कमी लेखू नका. अनुकूल परिस्थिती नाही म्हणून स्वतःची फसवणूक करू नका. तुलना, अनावश्यक स्पर्धा व अपेक्षांपेक्षा २१व्या शतकात चौकटीबाहेर विचार करण्याचे कौशल्य विकसित करून कठोर परिश्रम करा व स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करा, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची नगर वाचनालय, वणी च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लायन शमीम अहमद यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.
तसेच तालुका विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक प्राप्त करणारी कु. स्वरा डोंगरकर तसेच मार्गदर्शक शिक्षिका रश्मी कोसे व मोहिनी गोहोकार यांचाही पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला, लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, लायन अभिजित अणे, लायन महेंद्र श्रीवास्तव, लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन डॉ. प्रसाद खानझोडे, लायन नंदलाल शुगवानी, यवतमाळ येथील नितीन पखाले, प्रशांत गोडे, प्रा. चित्रा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसाद खानझोडे, संचालन सौ. सोनाली काळे, तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजित अणे यांनी केले.







टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या