Type Here to Get Search Results !

उमेदचा स्वतंत्र विभाग व कर्मचारी कायमस्वरूपी करण्याची निवेदनातुन मागणी

प्रतिनीधी/कोरा(मंगेश राऊत) : 

                   महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष समुद्रपूर येथील कर्मचारी समुदाय संसाधन व्यक्ती यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. याआधी २६ सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत असहकार आंदोलन पुकारण्यात आले होते, परंतु शासनस्तरावरून कुठलीही दखल न घेतल्याने पंचायत समिती समुद्रपूर येथे ठिय्या मांडले असून आज तहसील कार्यालय समुद्रपूर असंख्य महिलांच्या उपस्थितीत तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

           उमेद अभियानमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वेगळा विभाग म्हणून मान्यता देण्यात यावी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे शासन सेवेत नियमितीकरण करण्यात यावे, कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती यांना अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा समकक्ष दर्जा देण्यात यावा, या मागण्या करण्यात आल्या. परंतु अद्यापही शासनाने याची दखल घेतली नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील उमेद अभियानाचे कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. 

          ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना गरिबातून बाहेर आणण्यासाठी या अभियानाने सिंहाच्या वाटा उचलला आहे. परंतु कर्मचाऱ्यांचे भविष्यच अंधारात असून कंत्राटी म्हणून काम करताना शासनाच्या कुठल्याही सेवा या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. एका विशिष्ट मानधनावर त्यांना आपला व आपल्या कुटुंबांचा निर्वाह करावा लागतो, त्यामुळे शासनाने त्यांच्या न्याय मागण्या मान्य करून त्यांचे नियमित कर्मचारी म्हणून सेवेत समावेशन करून घ्यावे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. 

          या आंदोलनात निशा मेश्राम, जगदीश शेंडे, दिनेश आरसे,किशोर कोल्हे,राहुल बडोले,गजानन चतुर, रितेश जांभूळकर,लतिका कंडे,धीरज मून,अर्चना रामटेके,सीमा खेळकर,लता डंभारे,छाया बैलमारे, प्रशांत शेवडे,मंगेश वाघमारे व समुदाय संसाधन व्यक्ती व महिला आदींचा सहभाग आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad