Type Here to Get Search Results !

चैतन्य ढवळेच्या वैद्यकीय उपचाराची उंबरकर यांनी घेतली जबाबदारी

वणी / प्रतिनिधी : 
    वनरक्षक भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून नागपूर परिसरात उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रक्रिया पार पडली. सदर भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी परीक्षा दरम्यान दोन दिवसापूर्वी पेटूर येथील सचिन लांबट या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली त्यानंतर लगेचच याच परीक्षेदरम्यान वणी शहरालगत असलेल्या वाघदरा येथील चैतन्य ढवळे या युवकाला शारीरिक चाचणी दरम्यान पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा पाय तुटल्याची घटना घडली. उपस्थितांनी त्याला नागपुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले तर झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्याचे सल्ला डॉक्टरांनी दिला. सदर शस्त्रक्रियेसाठी लाखों रूपये लागत असुन ढवळे यांच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शस्त्रक्रिया शक्य नसल्याने हा खर्च आता मनसे नेते राजु उंबरकर यांनी उचलला आहे.
   अशा घटना वेळोवेळी घडत असतात त्यामुळे युवकांच्या आयुष्याचा विचार करता यावर उपाय शोधला पाहिजे असे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी युवकांचे म्हणणे आहे. या संदर्भात वणी येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील युवकांनी मनसेचे राजू उंबरकर यांची भेट घेऊन चैतन्यच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. गरीब घरातील युवक असल्याने त्याला मदत करावी अशी मागणी करत विनंती केली. यावेळी उंबरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता चैतन्यच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी उचलली असुन चैतन पूर्णपणे ठणठणीत होई पर्यंत मी त्याच्या सोबत असेल असा शब्द उंबरकर यांनी दिला. आज (दिनांक ०७ मार्च) रोजी सकाळीं नागपूरच्या खाजगी दवाखान्यात चैतन्यवर मोठी शस्त्रक्रिया पार पडली असुन पुढील उपचार सुरू असून लवकरच चैतन्य बरा होईल. 

"वणी विधानसभा क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या युवकांना विमा कवच काढून देणार आहे. सदर मैदानी चाचणी दरम्यान दोन दिवसापूर्वी एका युवकाचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे अशी माहिती मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी  दिली."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad