Type Here to Get Search Results !

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आज वणीत

वणी/प्रतिनिधी : 

                          शहरालगत असलेल्या परसोडा येथे दिनांक २७ जानेवारी पासून  जागतिक व्याख्याते तथा कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्री काशी शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. या शिवपुराणास आजवर माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, पालक मंत्री संजय राठोड यांच्या सह राजकीय व अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन कथेचा लाभ घेतला. आज दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी या कथेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला ठाकरे व पक्षाच्या राज्य सरचिटणीस सौ. रिटा गुप्ता भेट देणार आहे. मनसेचा गड असलेल्या वणी मतदारसंघात ठाकरे कुटुंबातील सदस्य येत असल्याने पक्षात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. सौ. शर्मिला ठाकरे वणीत पहिल्यांदाच येत असल्याने यांच्या स्वागतासाठी मनसे कडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. 

      परसोडा येथे चालू असलेल्या शिवपुराण कथेला दिवसाकाठी लाखो भाविकांची गर्दी असते. दुपारी ०१.०० ते ०४.०० च्या दरम्यान पंडीत मिश्रा यांच्या कथा वाचनाचा कार्यक्रम पार पडत असते. याच पार्श्भूमीवर उद्या दुपारी ०३.०० वाजता शर्मिला ठाकरे या कथा स्थळी दाखल होणार आहे. उद्याच्या कथेची सांगता आणि महाआरती ठाकरे यांच्या कडून होणार आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी पक्षनेते राजू उंबरकर यांच्या नांदेपेरा रोड येथील शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन त्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मतदारसंघातील कामकाजाचा आढावा घेणार असल्याची माहिती उंबरकर यांनी दिली.

          या दौऱ्यानिमित्त महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी होर्डिंग लावून कार्यकर्त्यांकडून स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे. वणी शहरात पहिल्यांदाच शर्मिला ठाकरे येणार असून महिला देखील त्यांना पाहण्यास उत्सुक आहेत. महिला सैनिकांकडून देखील मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या नंतर पुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर पत्नी शर्मिला ठाकरे राजकारणात सक्रिय आहेतच तर अनेक राजकिय विषयात त्यांची भूमिका पहावयास मिळत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दौरा होत असला तरी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं असून याचा परिणाम निवडणुकांवर होणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad