Type Here to Get Search Results !

प्रा. देविदास गायकवाड राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक गुणवंत प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित

वणी :

           झरीजामणी तालुक्यातील पाटण येथील राजीव कनिष्ठ महाविद्यालयातील( स्वतंत्र ), उपक्रमशील व शिस्तप्रिय प्रा. देविदास शोभा मोतीराम गायकवाड यांना नुकतेच पुणे येथे प्रोटॉन राज्यकार्यकारणीच्या वतीने राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक गुणवंत प्राध्यापक पुरस्काराने मा. वामन मेश्राम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आहे.

            प्रा. देविदास गायकवाड यांनी ग्रामीण भागातील गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना 'रुचेल आणि पचेल' अशा पद्धतीने इंग्रजीचे अध्यापन करून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलेले आहे. ते अत्यंत शिस्तप्रिय आणि उपक्रमशील प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळालेली आहे. त्यांनी अनेक वर्ष बारावीच्या केंद्रावर, उपकेंद्र संचालक व केंद्र संचालक म्हणून काम केलेले आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेणे ही त्यांची विशेष कामगिरी आहे. गेल्या पाच वर्षापासून ते इंग्रजीचे समीक्षक (मॉडरेटर ) म्हणून काम करतात. इंग्रजी पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम केले. 

              महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी शैक्षणिक दर्जेदार व शिस्तबद्ध वातावरण निर्माण केले होते. आपल्या दीर्घ अध्यापन कारकिर्दीत प्रा. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविले नाही, तर चरित्र, शिस्त, सामाजिक जाणीव आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी वैयक्तिक प्रयत्न केले आहे.

                         "शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून मार्गदर्शक आणि प्रेरणादायी नेता असतो", हा संदेश त्यांच्या कार्यातून सतत झळकत राहिला आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक जाणीव जागवण्यासाठी प्रा. गायकवाड यांनी विविध सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदविलेला आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून, विद्यार्थ्याबरोबरच समाजाचेही भविष्य उज्वल झालेले आहे.  

               प्रा. देवीदास गायकवाड हे केवळ शिक्षक नसून संवेदनशील साहित्यिकही आहे. त्यांचा "शिक्षण आमचा देव " हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. तसेच "पेटला वनवा", "जीवन सगर," "इंग्रजी ग्रामरचा राजमार्ग" इत्यादी पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

      या अगोदरही त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळालेले आहे.

             प्रा. देविदास गायकवाड यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक गुणवंत प्राध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad