वणी :
शहरातील खंडोबा-वाघोबा देवस्थान सभागृह येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य आणि ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शालेय गट वर्ग 6 ते 10 मध्ये "लोकमाता अहिल्याराणी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य" आणि खुला गट मध्ये "OBC (VJ,NT, SBC) च्या उज्वल भवितव्यासाठी जातनिहाय जनगणना आजची गरज.." या विषयावर झालेल्या या स्पर्धेत सुमारे 46 स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन समाजसेविका सौ. निलिमाताई काळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर तर प्रमुख पाहुणे संजय खाडे, संचालक, कापूस उत्पादक पणन महासंघ,मुंबई, प्रदीप बोनगीरवार,अध्यक्ष, सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, वणी, आशिष खुलसंगे,अध्यक्ष, वसंत जिनिंग, वणी, रमेश बुच्चे, सेवानिवृत्त प्राचार्य, धनराज भोंगळे, माजी नगरसेवक, भैयाजी पिंपळकर होते.
संजय खाडे यांनी तरुणांना संबोधित करताना सांगितले, “वक्तृत्व ही कला समाजात बदल घडवण्याचे प्रभावी साधन आहे. तरुणांनी आपले विचार निर्भयपणे मांडावेत.”
स्पर्धेत सहभागी तरुणांनी OBC (VJ,NT, SBC) च्या उज्वल भवितव्यासाठी जातनिहाय जनगणना आजची गरज.." या विषयावर आपले विचार मांडले. त्यांच्या विचारांनी उपस्थित श्रोत्यांना आणि परिक्षक नामदेवराव जेनेकर, प्रा. विजय बोबडे, लक्ष्मण इद्दे यांना प्रभावित केले. पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली शालेय गटातून तरफीया शेख,तर मनस्वी घोनमोडे दुसरा आणि तिसरा क्रमांक पूर्वी देशमुख यांनी पटकावला आणि खुला गटामधून प्रथम क्रमांक प्रेम जरपोतवार, द्वितीय क्रमांक जगदीश भगत आणि तृतीय क्रमांक हर्षल साळवे यांनी मिळवला. विजेत्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच ओबीसी समाजरत्न पुरस्कार प्रा. दिलीप मालेकार आणि ओबीसी समाजभूषण पुरस्कार अनुक्रमे नामदेवराव जेनेकर, किशोर ओचावर यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांनी मनोगत व्यक्त करताना, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्याचे महत्त्व सांगताना, हे केवळ बोलण्याची कला नसून, समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आणि स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करण्याचे साधन आहे. स्पर्धा, कार्यशाळा आणि नियमित सरावाने हे कौशल्य आत्मसात करता येते, जे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ कांडरकर तर संचालन योगिता विरुटकर व विलास शेरकी यांनी केले. आयोजक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय, वणी, श्री गुरूदेव सेवा मंडळ, सावर्ला आणि OBC (VJ/NT/SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी-झरी-मारेगाव, जि. यवतमाळ यांच्या अध्यक्षांनी “तरुणांचा उत्साह आणि त्यांचे सखोल विचार पाहून आम्हाला आनंद झाला. पुढील वर्षीही अशी स्पर्धा आयोजित करू.” असे वचन दिले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र बुच्चे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या