वणी :
येथील पोलिस स्टेशन हद्दीत मंदर शिवार, गौरी विहार लेआऊट येथे सोमवारी पहाटे मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहावर जखमा आढळून आल्याने, याप्रकरणी खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर, सपोनी निलेश अपसुंदे, सपोनी दत्ता पेंडकर, पोउपनि धीरज गुल्हाने यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात मृतकाच्या चेहऱ्यावर दगडाने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतकाची ओळख देवराव गुंजेकर (वय 60, रा. वागदरा) अशी झाली असून तो भंगार वेचण्याचे काम करीत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. “पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडावे,” अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुढील तपासातून या खळबळजनक खुनाच्या गूढावर प्रकाश पडण्याची अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या