वणी :
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या वणी (साई मंदिर चौक ) - नांदेपेरा (चौफुली ) मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाठपुरावा केला तर नुकतेच तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात खड्ड्यात बसून बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले आहे.
वणी (साई मंदिर चौक) ते नांदेपेरा (चौफुली ) हा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातांचे प्रमाणही वाढले होते. या समस्येविरोधात स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्ष वेळोवेळी आवाज उठवत होते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत होते.
नुकतीच मनसेने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वणी-नांदेपेरा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात खड्ड्यात बसून कमळाचे फुले सोडून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. सदर रस्त्याची निविदा निघून संबंधित कंत्राटदार याकामात दिरंगाई करत होता. त्यामुळे मंजूर निविदा रद्द करून नव्याने ही निविदा काढावी किंवा बांधकाम विभागाने स्वतः हे काम हाती घ्यावे अशी मागणी सुद्धा मनसेने केली होती. तर याबाबत मनसेने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याविषयी संवाद साधून याकामाला सुरुवात करण्याची मागणी केली त्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंतनु दुधडे यांच्या निर्देशावरून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मनसेने या यशाचे श्रेय नागरिकांच्या पाठिंब्याला आणि त्यांच्या आंदोलनांच्या एकत्रित ताकदीला दिले आहे. यापुढेही जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत राहणार असल्याची ग्वाही मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिली.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयूर गेडाम, विलन बोदाडकर, योगेश माथनकर यांच्या सह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या