Type Here to Get Search Results !

कर्मचाऱ्यांकडून सावित्रीबाई फुले वाचनालयास वाचनटेबल व पंखा भेट

वणी/प्रतिनिधी : 

                    सध्या सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटचा अधिकाधिक वापर करणारा तरूण वर्ग जरी असला तरी एखाद्या शांत ठिकाणी, एकांतात, पुस्तकांना आपला मित्र मानणाऱ्या तरूणाईची संख्या देखील कमी नाही. अनेकजण व्हॉट्सॲपवर आपल्या आवडत्या पुस्तकाचा फोटो सोशल मीडियावर स्टेट्स म्हणून टाकताना दिसतात. तर काही जण एकमेकांना पुस्तक भेट म्हणून देतात. तसेच काही युवा वर्ग मोबाईलमध्ये गुरफटल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. मोबाईलमध्ये अनेक ॲप व गेम उपलब्ध झाल्याने नवीन पिढीने पुस्तकांकडे पाठ फिरवली आहे.  हीच वाचन संस्कृती पुन्हा बहरण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी आहे. 

              या वाचनालयातून प्रेरणा घेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयातील कर्मचारी प्रज्वल गोहोकार आणि शुभम कडू यांनी वाचनालयातील वाचकांसाठी वाचनटेबल आणि पंखा वाचनालयाला भेट दिला. यावेळी कार्यक्रमाचे व वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर तर प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे होते. 

          सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक आहे. वाचन हा एक संवाद आहे. पुस्तकाचे वाचन केल्यास शब्दांच्या उच्चाराला धार येऊन उत्तम वक्तृत्व कौशल्य निर्माण होते, तर शब्दसंग्रह व ज्ञानात भर पडते. पुस्तक हे एक मार्गदर्शक असून, अनेक महान व्यक्तीमत्व पुस्तक वाचनातून प्रेरणा घेऊन घडले आहेत असे कर्मचारी शुभम कडू यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. 

         कर्मचारी प्रज्वल गोहोकार म्हणाले, की रोज काहीतरी वाचले आणि लिहिले पाहिजे. लिहू, वाचू आणि व्यक्त करू शकतो हे माणसाचे वेगळेपण आहे. माणूस जन्माला येताना कोरी पाटी घेऊन येतो आणि पुस्तके माणसाला विचार करायला शिकवतात.

    यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी कर्मचाऱ्यांनी वाचनालयाला भेट दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करून कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच युवकांनी मिळेल ते वाचले पाहिजे आणि लक्षपूर्वक वाचले पाहिजे. एकाचवेळी वेगवेगळी पुस्तके वाचता येऊ शकतात. तसेच इतरांना वाचण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. वाचनातून दररोज एक नवीन शब्द शिकला पाहिजे. असे अध्यक्षीय भाषणातून सांगितले. 

      यावेळी वाचनालयाचे संचालक प्रा. अनिलकुमार टोंगे, गजेंद्र भोयर, मारोती जिवतोडे, नरेंद्र गायकवाड, विनोद बोबडे, सुरेंद्र घागे, सभासद नामदेवराव जेनेकर, मंगेश खामनकर आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष अशोक चौधरी, प्रास्ताविक सचिव प्रा. विजय बोबडे होते तर उपस्थितांचे आभार संचालक सुरेश राजूरकर यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad