प्रतिनिधी/कोरा (मंगेश राऊत) :
सध्या वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच आता डीएलएड अभ्यासक्रमांकडेही बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसत आहे. नागपूर विभागातील ६०० जागांसाठी पंधराशेहून अधिक अर्ज विद्यार्थ्यांनी डीएलएड साठी सादर केले आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेमार्फत सुरू असलेल्या डीएलएड ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून विदर्भातील काही जिल्ह्यांतील अनुदानित अध्यापक विद्यालयांतील प्रवेश पूर्ण झाले असून, बहुतांश अनुदानित अध्यापक विद्यालयांतील प्रवेश पूर्ण होण्याच्या वाटेवर आहेत. मागील पाच वर्षांपासून अध्यापक विद्यालयावरील असलेली अवकळा दूर होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. बारावी निकालाच्या वेळेस 'लोकमत'मधून पवित्र पोर्टलमार्फत राज्य शासन प्राथमिक शिक्षकांची भरती करत असल्याची बातमी प्रकाशित झाल्यामुळे अनेक विद्यार्थी डीएलएड प्रवेशाकडे वळले आहेत, असे अध्यापक विद्यालयातील शिक्षक सांगत आहेत. कला व वाणिज्य शाखांतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा डीएलएड करण्याकडे कल दिसत असून, शाळेत असलेल्या प्रशिक्षित शिक्षिकासुद्धा डीएलएड करण्यासाठी इच्छुक आहेत. नागपूर विभागातील शासकीय अनुदानित अध्यापक विद्यालयांची मंजूर प्रवेश क्षमता ६०० असून, या जागांकरिता पंधराशेहून अधिक अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले आहेत.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा डीएलएड अभ्यासक्रमाकडे कल वाढल्यामुळे अध्यापक विद्यालयाच्या संघटनेने विशेष फेरीचे आयोजन करण्याची विनंती एससीईआरटी पुणे ला केली.
"पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शिक्षकांची भरती सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डीएलएड प्रवेशबाबत उत्सुकता व सकारात्मक वातावरण तयार झाले आहे"
- चंद्रकांत गंपावार, प्राध्यापक, यशोदाबाई खरे सेवासदन अध्यापक विद्यालय, नागपूर
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या