प्रतिनिधि/वर्धा (मंगेश राऊत) :
परिवर्तनधारा साहित्य कला मंच ही संस्था वर्धा शहरांमध्ये सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त संस्था आहे. या संस्थेच्या उभारणीत आणि वाटचालीत डॉ. प्रवीण वानखेडे यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच वर्धा शहरामध्ये सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कर्तुत्वाने एक वेगळा ठसा उमटविला होता. परंतु ऐन उमेदीच्या वयात काळाने डॉ प्रवीण वानखेडे यांच्यावर १० मार्च २०२२ रोजी झडप घातली . डॉ. प्रवीण वानखेडे यांनी अगदी शालेय जीवनापासून अनेक तालुका , जिल्हा तसेच राज्यस्तरीय वकृत्व , वादविवाद स्पर्धा गाजविल्या होत्या .त्यांच्या कृतीशील स्मृती कायम स्वरूपी प्रेरणा देत रहाव्या, यासाठी परिवर्तनधाराने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक २८ जुलै २०२४ ला सकाळी १०. ०० वाजता डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा येथे केले आहे.
या स्पर्धेत वर्ग दहावी ते पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांना स्पर्धेची प्रवेश फी १००/ रुपये निर्धारित केलेली आहे. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना प्रथम (५०००), द्वितीय (४०००), तृतीय (३०००) आणि २०००/ रू. चे दोन प्रोत्साहनपर रोख पुरस्कार तसेच सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल शिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिल्या जाईल. स्पर्धेचे प्रथम, द्वितीय, तृतीय हे रोख पुरस्कार डॉ अनिता प्रवीण वानखेडे यांचेकडून तर प्रोत्साहनपर पुरस्कार मिनाक्षी प्रमोद पाटील, राहुल हलुले यांच्याकडून देण्यात येतील. या स्पर्धेसाठी डॉ. सुनील तोतडे, प्रा. योगिता तागडे, प्रशांत जारोंडे, यशवंत मात्रे यांनी विशेष आर्थिक सहकार्य केले आहे. या स्पर्धेची प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख २० जुलै आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई यांच्या हस्ते होणार असून समारोपीय आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम डॉ. चेतना सवाई यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण धोपटे, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ उपसंपादक मा. योगेश बढे, डॉ. अनिता प्रवीण वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
या स्पर्धेची प्रवेशिका इच्छुक स्पर्धकांनी प्राध्यापक प्रशांत जिंदे (७३८५३९२०२१), प्रा. महेंद्र वानखेडे (९९२२७८४२३४), दीपक कांबळे सर (९६५७०६१२८४) यांच्या भ्रमणध्वनीवर स्वीकारल्या जातील.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. राजेश डंभारे, प्रकाश कांबळे, डॉ. हरीश पेटकर, मुकुंद नाखले, जीवन निमसडकर, सुनिल ढाले, सुभाष चंदनखेडे, चरण गायकवाड, सचिन ताकसांडे इत्यादी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या