वणी, शुभम कडू :
वणी विधानसभा क्षेत्रात वणी उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात येण्यासाठी मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी अनेक प्रयत्न केले आहे. नागरिकांना सोयीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आंदोलन, पत्र व्यवहार करून मागणी केली होती या मागणीला आता मोठं यश आले असून याठिकाणी लवकरच उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीच पत्र मनसे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देण्यात आले. त्याची तत्काळ दखल घेत सावंत यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देणार असुन हे रुग्णालय लवकरच चालु होईल असे आश्वासन दिले.
अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी विधानसभा क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे. या भागात दगडी कोळसा, डोलामाईट, लाईमस्टोन यासारख्या खनिज संपत्तीच्या मोठमोठ्या खाणी आहेत. ह्या खाणीतील होणारे उत्पन इतरत्र पाठविण्यासाठी राबविली जाणारी वाहतूक यंत्रणा या दरम्यान दिवसाकाठी अनेक गंभीर अपघात होतात तर या खादानीतून होणारे वायू, जल व मृदा प्रदूषण यामुळे अनेक आजार येथील रहिवाशांना आहेत. या सर्व बाबीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयासमोर पक्षनेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात तसेच मनसे रुग्णसेवा केंद्राच्या माध्यमातून गेल्या १८ वर्षापासून रुग्णाची सेवा करत आहे.
वणी येथे उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी मनसेचे सोनेरी आमदार स्व रमेश वांजळे यांच्या माध्यमातून विधानभवनात लक्षवेधी सुध्दा मांडण्यात आली होती. कोरोना काळात हे उपजिल्हा रुग्णालय व येथील ट्रॉमा केअर सेंटर चालु व्हावे यासाठी राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक १४ एप्रिल २०२१ पासून ५ दिवस आमरण उपोषण देखील करण्यात आले. मात्र या गोष्टीकडे स्थानिक विद्यमान लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्याने हे काम रखडले असल्याचे म्हंटले आहे.
वेळोवेळी मनसेने रुग्णसेवेच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा विडा उचलला आहे. ही बाब तत्कालीन दिवंगत आ. रमेश वांजळे यांना समजली आणि त्यांनी तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या निदर्शनास आणली. राज्यात सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा तयार करण्यात आला. अस्तित्वात असलेल्या ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले. तर राज्यातील ३४ ठिकाणी मान्यता देण्यात आली. वणी वगळता अन्य ठिकाणचे उपजिल्हा रुग्णालय सुरु झाली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
वणी विधानसभा मतदार संघ हा आदिवासी बहुल असुन यामध्ये वणी ,मारेगाव,झरी या तीन तालुक्याचा समावेश आहे.यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात ज्या प्रमाणे रुग्णांची गर्दी असते त्याच प्रमाणे येथे रुग्णांची गर्दी असते त्यामुळे याठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केयर युनिट अपेक्षित आहे. याठिकाणी रुग्णालय झाल्यास अनेक वैद्यकीय प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत येथे ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे. त्यामुळे येथील बहुतांश रुग्णांना चंद्रपूर, नागपूर किंवा वर्धा या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवावे लागते. ही फार मोठी अडचण आणि शोकांतिका असल्याचे उंबरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने वणी शहर व वणी मतदारसंघातील जनतेची सर्वात मोठी समस्या लक्षात घेता.राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा लागू करण्यासाठी मदत करावी व उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांच्या आजारावर याच ठिकाणी उपचार सुरु होणार आहे त्यामुळे राजू उंबरकर यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या मागणीला आता यश आले असून शासन स्तरावरून येत्या काही दिवसातच या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती उंबरकर यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या