प्रतिनीधी/वर्धा(मंगेश राऊत) :
वर्धा लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जून 2024 रोजी होणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. भारतीय खाद्य निगम, बरबडी रोड, वर्धा येथे मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली जात असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
येत्या 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीसाठी 600 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने 400 पोलीसांचा बंदोबस्त राहणार आहे. वर्धा लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी विधानसभा निहाय नियोजन करण्यात आले असून 36-धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघासाठी 27 फेऱ्या, 43-मोर्शी विधानसभा मतदार संघासाठी 23 फेऱ्या, 44-आर्वी विधानसभा मतदार संघासाठी 22 फेऱ्या, 45-देवळी विधानसभा मतदार संघासाठी 24 फेऱ्या, 46- हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी 25 फेऱ्या व 47-वर्धा विधानसभा मतदार संघासाठी 24 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी विधानसभा निहाय 14 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. टपाली मतमोजणीसाठी 9 व इटीपीबीएस मतमोजणीसाठी 5 टेबल असतील. राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी यादृष्टीनेही नियोजन केले आहे. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या