Type Here to Get Search Results !

चला वेदनांच्या ओठांवर 'स्माईल' आणूयात

  जीवनाच्या प्रवासातील काही घटना आपल्याला बरंच काही शिकवत असतात. कित्येकदा त्या घटना असह्य वेदना देऊन जातात आणि साक्षीदार फक्त आपणच असतो. इतरांकारिता आपले दुःख, वेदना दुर्लक्षित राहतात. कारण बरेच जण आपले दुःख वेदना गांभीर्यानं घेत नाहीत. कारण ते स्वतःला सहन करावं लागतं त्यांना नाही.  जवळचेसुद्धा ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. समजून घेण्याकरिता फक्त शब्द म्हणून ऐकावं लागतं. असं नाही तर त्या भावना म्हणून समजून घ्यावं लागतं.विचार करावा लागतो. बारकाईने परिस्थिती समजून घ्यावी लागते. आलेले चांगले वाईट अनुभव हे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतात.अनुभव आयुष्यभराची शिदोरी असते; परंतु तुम्ही दिलेल्या वाईट अनुभवांमुळे जर कोणालाही असह्य वेदना झाल्या असतील तर वारंवार चुका अपेक्षित नाहीत.जर तसं झालं तर ती व्यक्ती फक्त आठवण म्हणून असेल आणि शांततेत दूर गेलेली व्यक्ती जवळजवळ परत येण्याची शक्यता फार कमी असते. व्यक्ती दूर झाली तरीही प्रेम जेव्हा एकमेकांच्या आत्म्याशी झालेले असते तेव्हा ते कायम शेवटपर्यंत सोबत असतेच.

      आपल्या भावना, आपली दुःखं, आपलं आपल्याशीच झालेलं हितगूज किंवा मग आपली मागं पडलेली स्वप्नं या सगळ्यांचे आपणच एकमेव साक्षीदार असतो. अनुभव आयुष्यातील  चढ-उतारांची जाणीव करून देत असतं,  दुःखानंतर सुख येतंच, फक्त संयम राखा हे सांगून जातं. अनेकदा माणूस माणसांनी वेढलेला असूनही एकटा होतो. तेव्हा हाच कोपरा आपल्या सोबती, सखा होतो. इथं आपण एकटे सांगणारे आणि एकटाच ऐकणारे असतो. तरीही हा मूक संवाद सुखावह असतो. आपलंही कुणी तरी ऐकतं, ही जाणीवच मनाला सुखावून जाते. अपेक्षा कुठलीच नसते. असते इच्छा फक्त, व्यक्त होण्याची आणि तेव्हा हाच कोपरा आपल्या मदतीला धावतो. तसं तर सगळं घरच आपलं असते ; पण मनाचा एक हळवा कोपरा असतो,तसा हा घराचा एक हळवा कोपरा आहे. असं म्हणतात शब्दांचा संवाद तसा खूप असतो, पण मूकपणे ऐकणारा क्वचितच भेटतो, आपलं म्हणणं सांगणारे खूप भेटतात, 

आपलं ऐकणारा मात्र क्वचितच भेटतो!

          असं म्हणतात की प्रेमापेक्षा वेदनेचं नातं जास्त घट्ट असावं. जो तुम्हाला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त संभाळतो, आयुष्य  समजतो. तुमच्या डोळ्यात अश्रु न यावेत याकरिता वाटेल ते प्रयत्न करतात. तुमच्या खराब वागणुकीमुळे त्यांना वेदना होतात या वेदना का दिसत नाही तुम्हाला ? असं म्हणतात विचारांची रात्र व खोलवर वेदांनचे चटके हे आयुष्यभर लक्षात असतात. 

               आयुष्यात कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं, मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशास तशा मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की, आपल्याला त्या भावना मोकळ्या मनानं मांडता येत नाहीत कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर तशी व्यक्तीच सापडत नाही. सापडली तरी ती समजून घेईलच असंही नाही. जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा सोबत असेल असंही नाही. ही अशीच अनेक दुःख मनात ठेवून आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. म्हणूनच तर वपुंच्या या ओळी मनाला स्पर्श करतात ...... 

           "जगाचा निरोप घेताना माणूस येथून काहीही नेऊ शकत नाही. यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेली; पण सांगता न येणारी असंख्य दुःखं तो आपल्याबरोबर नेतो! "

     माणसाला असह्य वेदना होतात. तेव्हा त्याचं मानसिक संतुलन ढासळतं. तो पूर्णपणे मूर्ख बनतो. जेव्हा प्रेमात पागल होऊन पूर्णपणे समर्पित होतो. व्यवहार न समजता भावना म्हणून समजतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा त्याला प्रेम होते व अशी व्यक्ती जेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून वारंवार दुखविली जाते आणि त्यामुळं मनावर आघात होतात. असह्य वेदना त्याला सहन कराव्या लागतात. कोणीही स्वतःहून त्रास करून घेत नाही. तर त्याला नकळत वेदना होत असतात. जसं आई रडली की मुलाला त्रास होतो. मुलगा रडला तर आईला दुःख होतं एकदम तसंच. 

           एखादी व्यक्ती तुमच्यावर जेव्हा प्रेम करते, ज्या व्यक्तीसाठी खूप खास असता मग तो तुमचा मित्र, मैत्रीण, प्रेयसी, प्रियकर कोणीही असू शकतो.

      खास करून अशा व्यक्तींना बिलकुल हलक्यात घेऊ नका. कारण तुमची अत्यंत खराब वागणूक, बोललेले खोटे शब्द, लपविलेल्या गोष्टी व चुकीच्या व्यवहारामुळे त्यांना अत्यंत वेदना होतात. खरंच असह्य अशाच असतात. असं असूनही जेव्हा ती व्यक्ती अत्यंत नम्रपणे तुमच्याशी वागते, सर्व सहन करते का ? उलट ती तुमच्याशी जशास तसं न वागता नम्र वागते. कारण त्यांना तुम्हाला कधीच दुखायचं नसतं. कारण ज्या व्यक्तीनं वेदनांचे चटते सहन  केले असतात, ती व्यक्ती दुसऱ्याला कधीच दुखवत नाही. वाईट वागत नाही. तुमच्यासाठी त्याने केलेले प्रयत्न या गोष्टी असं सिद्ध करतात की, ते तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात.जी व्यक्ती असह्य वेदना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी, सोबत राहण्यासाठी सहन करते. ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीही करू शकते ही गोष्ट तेवढीच खरी.

    बरेचजण प्रेमात आत्महत्या का करतात. तर मला असं वाटतं की, खरंतर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला जिवंत असताना किंवा नसताना कायमची सोडून जाते.  तेव्हा होणाऱ्या वेदना खरं तर असह्य असतात. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सांभाळू शकते असंही नाही.  प्रत्येक व्यक्ती उत्तर शोधू शकत नाही. काही प्रश्नांची उत्तरं वेळेवर सापडतात. असंही नाही. बऱ्याच जणांना या वेदना सहन करण्यापेक्षा जीव गेलेला बरा असा विचार येतो. जसं अगरबत्ती वेदनांचे चटके सहन करत संपत असते. अगदीच तसंच.जेव्हा व्यक्तीला असं वाटतं तेव्हा खरंच त्या वेदना अत्यंत त्रास देणाऱ्या असतात. त्या वेदनेमुळे माणसाच्या मनावर, शरीरावर, हृदयावर, विचारांवर  इतका आघात होतो आणि सर्व गोष्टी माणसाला सहन होत नाहीत.... रात्री झोप न येणं, डोळ्यात अश्रू येणं, जेवण करायला मन न लागणं, छाती दुखणं, चिडचीड करणं, शरीर थरथर कापणं इत्यादी. शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात. त्यामधे वायब्रेशन होणं अशा सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा वेदना होतात.  

              त्या वेदना तुम्हाला पुष्कळदा रडवून सोडतात. बऱ्याचदा तुम्हाला असंही वाटेल की तुम्ही त्या व्यक्ती जवळ मनसोक्त रडावं. परंतु ती व्यक्ती तुमच्या जवळ नसते. म्हणून पर्याय नसतो. बऱ्याच घटना तुम्हाला सहन करव्या लागतात तेव्हा कळतं वेदना काय असतात. आयुष्यात इतकं निःस्वार्थीपणानं राहूनसुद्धा अशा व्यक्ती दुर्लक्षित का राहतात ? त्यांच्या वाटेला का एवढी दुःखं येतात ?  त्यांना समजून का घेतलं जातं? 

        जेव्हा व्यक्तीला वेदनांचे चटते झोंबतात. तेव्हा त्रास किती असेल याची कल्पना करू शकत नाही. पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.असे म्हणतात की, रोता हुआ पुरुष' इस सृष्टि का सबसे 'दुर्लभ' दृश्य है। हे स्त्री ! तुम चूमना उसकी आँखें... और कहना... "तुम रो सकते हो...!"

           ज्या व्यक्तींवर आपण प्रेम करतो त्याच व्यक्तीमध्ये असह्य वेदना देण्याची ताकद असते. अन्यथा दुसरी व्यक्ती तुम्हाला असह्य वेदना देऊ शकत नाही. वेदना ह्या दिसत जरी नसल्या तरी जो सहन करतो त्याला विचारा. हेच की वेदना झाल्यानंतर किती त्रास होतो. झाल्यानंतरही जेव्हा आपल्या वेदना सांगतो तेव्हा ती व्यक्ती जेव्हा तुमच्या वेदनाची दखलसुद्धा घेत नाही. स्वतःमधे बदल आणत नाही. तेव्हा शांत होण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. म्हणून असं म्हणतात  Great Souls suffer in Silence. 

   आतापर्यंतच्या आयुष्यात मला एक गोष्ट समजली की सर्वात कठीण गोष्ट असते ती म्हणजे निस्वार्थी प्रेम करणं. या जगात निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती भेटणं जवळजवळच अशक्य आहे. नाशिबानं अशी व्यक्ती जर तुम्हाला भेटली तर खरच स्वतःपेक्षा जास्त जपण्याचा त्यांना प्रयत्न करा. कारण खरच सांगतो मलासुद्धा आत्तापर्यंत अशी व्यक्ती मिळाली नाही . जर खरंच मिळाली तर त्या व्यक्तीसाठी वाटेल ते करण्याची माझी पूर्ण तयारी असेल. तुम्हीसुद्धा ठेवा आयुष्यात कधी असंही होतं की आपल्या वेदना,दुःख आपल्याला फक्त त्याच एखाद्या व्यक्तीला सांगाव्याश्या वाटतात. ती एक व्यक्ती प्रत्येकदा आपल्याकरिता उपलब्ध असेलच किंवा वेळ देईलच असेही होणार नाही. जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची अत्यंत आवश्यकता असेल कदाचित ती व्यक्ती दुसऱ्या सोबत आनंदीत असेल, दुसऱ्या व्यक्तीला वेळ देत असते तेव्हा कळतं वेदना काय असतात. म्हणून आयुष्यात कधी कधी कोणाजवळही समस्या, वेदना, दुःख व्यक्त करता येत नाही. तरीसुद्धा स्वतःचं दुःख, वेदना, संघर्ष, समस्या  स्वतः सांभाळू शकलो पाहिजे. एवढं कणखर स्वतःला बनवावंच लागेल. 

              प्रत्येकच व्यक्ती असह्य वेदना सहन करू शकते किंवा शकेल असं नाही. कारण वेदना सहन करण्यासाठी मृत्यूच्या दारातून परत येण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण करावी लागते. ती निर्माण झालेली नसेल तर नक्कीच मृत्यूच्या दारातही जाण्याचा विचार बरेचजण करतात. म्हणूनच अनेक व्यक्ती प्रेमात आत्महत्या का करतात याची कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. 

    जी व्यक्ती फक्त तुमच्या स्पर्श केल्यानं रडते, तुम्ही दुःखी म्हणून त्याच्या डोळ्यात अश्रू येतात.

  फक्त तुमची आठवण आली म्हणून  व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू पाझरतात. ज्याला तुमचा भास होतो. जवळ खूप काही असूनसुद्धा तुमच्यावरचे इंटरेस्ट कमी होऊ देत नाही. तर विचार करा इतक्या सर्व गोष्टी केल्या नंतरही तुमच्याकरिता त्या व्यक्तीला वेदना होत असतील. 

   जेव्हा दोघात तिसरा येतो, विचार न करता काही गोष्टी मनाला वाटेल तशा केल्या जातात. ही गोष्ट ज्या व्यक्तिमुळे होते, ती आत्महत्या न करता ज्याला या गोष्टी सहन होत नाही, जे खूप जास्त हळव्या मनाचे असतात ते आत्महत्या सारखे निर्णय घेतात. अशी बरीच उदाहरणं मी वाचली आहेत. परंतु हे चुकीचे आहे.

  चुका वारंवार होत असतील तर एकमेकांच्या दूर जाण्याचा निर्णय घ्या. परंतु जीव देऊ नका. तुमच्यावर जीवपाड प्रेम करणाऱ्या लोकांना तुम्ही वेदना देऊन जाऊ नका... 

     जेव्हा एक हासता चेहरा मनातून दुःखी होतो, वेदनांचे चटके  झोंबतात व स्माईल हरवते तेव्हा कळतं की वेदना म्हणजे काय. 

  जेव्हा स्वतःला थरथर कापताना रडताना, मरताना तडपताना, स्वतःचा दम घुटताना बघावं लागतं,शांत व्यक्ती जेव्हा चिड़चिड़ करायला लागते आणि एक युद्ध जेव्हा स्वतःशी लढावं लागतं व एवढं प्रेम करुनसुद्धा हरावं लागतं तेव्हा समझतं वेदना आणि प्रेम म्हणजे काय.

जेव्हा माणूस रडतो, तेव्हा फक्त त्याच्या डोळ्यातूनच अश्रूच येत नाहीत. तर त्याचं शरीर, विचार, विश्वास, समर्पण,त्याग ,संयम आत्मा, या सर्व गोष्टी रडत असतात

   असं वाटतं रडणाऱ्या हृदयाला,मनाला व थरथरणाऱ्या शरीराला जवळ करून शांत करावं.

   जेव्हा तुमच्या असह्य वेदनांचा खून होतो, तेव्हाही तशा परिस्थितीत तुम्ही विचार करता की त्या व्यक्तीसोबत मला शेवटपर्यंत राहायचे आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तेव्हा कळतं की प्रेम म्हणजे काय असतं. ज्या व्यक्तीनं कधी कुणाकडूनही अपेक्षा केली नाही; परंतु जेव्हा नकळतपणे प्रेम झालं की, अपेक्षा येतात. जेव्हा छोट्या छोट्या अपेक्षा भंग होतात आणि त्याही जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा कळतं माणूस शांत कसा होतो. 

   तुम्ही जिवापाड काळजी केल्यानंतरही त्या व्यक्तीला पाहिजे तशी तुमची काळजी वाटत नाही. तेव्हा कळतं वेदना म्हणजे काय.

  तुम्हाला वाचनाची आवड़ आणि अनुभवाची ताकद या दोन गोष्टीच्या आधारावर दुःख काही प्रमाणात सहन करू शकता. वेळेनुसार हळूहळू दुःख नक्कीच कमी होईल; पण संपणार नाही.

आणि शेवटपर्यंत लढण्याची तयारी असू द्या.

   शेवटी एवढच सांगतो चांगल्या व्यक्तींची परीक्षा कधीच घेऊ नका. कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच दाखवणार नाहीत. ते तुमच्या आनंदासाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून गेलेले असतात किंवा आयुष्यभर सोबत असतात. शेवटी एवढंच सांगतो कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका. हसवता नाही आले तरी अश्रुंचे कारण होऊ नये.

      एकमेकांना सांभाळा. कारण  वेदनांचं ओझं नक्कीच हलकं होईल. चला कितीही संकट येऊद्या आपण लढूयात. मात्र आनंदच जगूया........ 


सागर जाधव,  (7038204209)

वॉटर सप्लाय , वणी, जिल्हा यवतमाळ

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad