शहरालगत असलेल्या परसोडा येथे दिनांक २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून शिवपुराण कथा संपन्न होत आहे. यावेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रदीप मिश्रा यांचे आगमन झाले असता त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी जंगी स्वागत केले. फुलांची उधळण, फटाक्याच्या आतिषबाजीत आणि भक्तिमय वातावरणात हजारों वणीकरानी हे स्वागत केले.
या स्वागताचे नियोजन मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्याकडे होते. या उत्कृष्ठ नियोजन आणि स्वागत पाहून आणि आपल्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होत असतात असे उद्गार काढत याबद्दल पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांनी राजू उंबरकर यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तर स्वतःच्या गळ्यातील हार काढून उंबरकर यांच्या गळ्यात टाकून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मध्यप्रदेश येथील प. पु. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी वणीकरांसाठी मिळणार आहे. पंडित मिश्रा यांचे लाखो अनुयायी आणि भाविक भक्त कथेचे श्रवण करण्यासाठी येणार आहेत. असंख्य भाविक भक्त उपस्थित राहणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमास लाखो भाविक भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक राजकुमार जयस्वाल यांनी दिली.
"वणीकरांसाठी हा अलौकिक असा भक्ती-शक्तीचा महिमा आणि शिवपुराणाचे ज्ञान देणारा अध्यात्मिक सोहळा आहे. श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचनासाठी वणीतील परसोडा येथे संपन्न होणार आहे. भाविक-भक्तांनी आणि साधकांनी या मोफत कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे.असे आवाहन आयोजक राजकुमार जयस्वाल यांनी केले."
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या