Type Here to Get Search Results !

वणी शहरात एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणी दोघांना अटक; 3.37 ग्रॅम ड्रग्ज, बुलेट मोटरसायकल जप्त

वणी : 
          शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत टिळक चौक येथे १० सप्टेंबरच्या रात्री ११ वाजता दोन युवकांना एमडी ड्रग्ज विक्रीच्या आरोपाखाली अटक केली. या कारवाईत ३.३७ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर, एक बुलेट मोटरसायकल आणि दोन स्मार्टफोन असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
                                                  स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, टिळक चौक परिसरात अमली पदार्थांची डील होणार आहे. या माहितीच्या आधारे पथकाने त्या ठिकाणी पाळत ठेवली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका आइस्क्रीम दुकान आणि पानटपरीच्या मागे एमडी ड्रग्ज विक्री सुरू असताना पथकाने झडप घालून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, एका प्लास्टिकच्या पिशवीत ३.३७ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आढळून आली.
                  अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे युगांत दिनेश दुर्गे (वय १९, रा. शिवाजी चौक, विसापूर, जि. चंद्रपूर, हल्ली मुक्काम पंचशील नगर, वणी) आणि शहबाज सत्तार मिर्झा (वय ३४, रा. साईनगरी, वणी) अशी आहेत. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(ए), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. पथकात एपीआय दत्ता पेंडकर, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख आणि चालक सतीश फुके यांचा समावेश होता.
                वणी शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून, नागरिकांना संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad