वणी :
भारतीय जनता पक्षाच्या यवतमाळ जिल्हा संघटनेच्या नेतृत्वात महत्वाची भर पडली आहे. वणी येथील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते कुणाल विजय चोरडिया यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत नवचैतन्य येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
कुणाल चोरडिया हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय आहेत. तरुणांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता असून, अनेक युवक कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. त्यांच्या या नेमणुकीमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला मोठा राजकीय फायदा होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
भाजपने त्यांच्या कामाचा आलेख, सामाजिक सहभाग आणि संघटन कौशल्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. त्यांनीही पक्षाच्या धोरणांनुसार वचनबद्धतेने कार्य करत पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल विविध राजकीय व सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, वणी व परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आणि पक्षातील विरोधक पडले "तोंडघशी"
कुणाल चोरडिया यांना जिल्हा उपाध्यक्ष पद एका महिन्यापूर्वीच निश्चित झाले होते. याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी संकेत दिल्याने काही तरुण कार्यकर्त्यांनी शहरात भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून बॅनरही लावून दिले. मात्र पक्षातील काही असंतुष्ट लोकांनी कुणाल चोरडिया यांना उपाध्यक्ष पदावर आक्षेप घेतला होता. तसेच चोरडिया यांना पद देण्यात येऊ नये यासाठी पक्षाचे वरिष्ठ पातळीवर नेत्यांकडे आक्षेप नोंदविला. मात्र भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या यादीत कुणाल चोरडिया यांचे नाव आल्याने विरोधक "तोंडघशी" पडल्याचे दिसून येत आहे.
पक्षा पेक्षा व्यक्ती मोठी नाही!
भारतीय जनता पक्षात पार्टीला अधिक महत्त्व आहे व्यक्ती ला नाही! मात्र पक्षात काही पदाधिकारी व्यक्तीमत्वाला महत्त्व देत असल्याने पक्षाचे एकप्रकारे नुकसान होत आहे त्यामुळे हेवेदावे विसरून पक्षवाढीसाठी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम केले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळेल असं काही राजकीय जाणकारांचे मत आहे.
विजय चोरडिया कायम निमंत्रित सदस्य...
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य व कुणाल चोरडिया यांचे वडील विजय पारसमल चोरडिया यांची यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कायम निमंत्रित सदस्य म्हणून मनोनीत करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या