Type Here to Get Search Results !

सोच' युवा छावणी २०२५ – राजगुरूनगर, मैत्री हिल्स येथे उत्साहात संपन्न

प्रतिनिधी / वर्धा ( मंगेश राऊत ) : 

                                         महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा विभागाच्यावतीने आयोजित केलेली दुसरी युवा छावणी 'द सोच  2025' दिनांक ९, १० व ११ मे, २०२५ रोजी राजगुरूनगर येथील 'मैत्री हिल्स' या निसर्गरम्य ठिकाणी यशस्वीरीत्या पार पडली.

         महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासोबतच प्रगल्भ व सजग समाज निर्माण व्हावा यासाठी सतत कार्यरत असते. समितीचा युवा विभाग युवकांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम राबवतो. 'सोच युवा छावणी' ही त्यातीलच एक

         2024 साली सुरू झालेल्या सोचचं हे दुसरं वर्ष. संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 110 शिबिरार्थी या छावणीत सहभागी झाले होते. तरुणांमध्ये सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशीलता निर्माण व्हावी आणि त्यांच्या विचारांना दिशा मिळावी हे या छावणीचे उद्दिष्ट होते. 9 मे रोजी छावणीचं उद्घाटन झालं. गटानुसार विविध रंगांच्या रिबीन्स हाताला बांधून शिबिरार्थींचं स्वागत केलं गेलं. उद्घाटन सत्राला प्रसिद्ध लेखक, कवी अरविंद जगताप हे उपस्थीत होते. सोबतच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे आणि युवा विभागाच्या राज्य कार्यवाह प्रियांका खेडेकर आणि मैत्री हिल्सचे सर्वेसर्वा डॉ. कटारिया देखील विचारमंचावर उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन  नेहमीप्रमाणे वेगळ्या अंदाजात केले गेले. शिबिरार्थ्यांनी 'आपल्या मनातील भारत' या थिमला अनुसरून आपल्या आसपासच्या निसर्गातील वस्तूंमधून विविध प्रतिकृती साकारल्या होत्या. सोबतच त्याविषयीचं मनोगतही गटानुसार करण्यात आलं. 

              या उपक्रमाने शिबिरार्थींच्या सृजनशीलतेला चालना मिळाली. या उद्घाटन सत्राचं प्रास्ताविक प्रियांका खेडेकर यानी केलं. आपल्या मनोगतात अरविंद जगताप म्हणाले की, "आजची समाज माध्यमं जेव्हा जेव्हा विचार न करता असंवेदनशीलपणे लोकांसमोर गोष्टी मांडत आहेत तेव्हा युवकांनी सजग होणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी संशोधन क्षेत्रात येणं गरजेचं आहे." तसेच "विचारी युवा पिढी घडणं देशाच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे." असंही ते म्हटले. अध्यक्षीय भाषणात माधव बावगे म्हणालेत की, " सध्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ चालू आहे. याकडे कुणाचंच लक्ष नाही. अशा काळात सगळा समाज झोपलेला असताना युवकांनी ड्रायवरची भूमिका बजावायची आहे.". सत्राच्या शेवटी पाहुण्यांचे आभार मुंबई जिल्ह्याचा कार्याध्यक्ष रूपेश याने मानले.

         या तीन दिवसीय छावणीत विविध सत्रांद्वारे विचारांची घुसळण केली गेली. पहिल्या दिवशी तीन सत्र घेतली गेली. तसेच शिबिराथींचे गट पडून त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या. 'संविधानाची तोंडओळख' या पाहिल्या सत्राला संवाद साधण्यासाठी संविधान संवादक म्हणून ओळखले जाणारे राजवैभव उपस्थित होते. त्यांनी शिबिरार्थींना संविधानातील मूल्यांची अगदी सोप्या पद्धतीने ओळख करून दिली. 

          दुसऱ्या सत्रात 'विवेकी व्यक्तिमत्व विकास' या विषयावर संवाद साधण्यासाठी महा. अंनिसचे ..... विनायक सावळे  उपस्थित होते. विवेकी व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांनी या सत्रातून अगदी हसत खेळत संवादात्मक पद्धतीने शिबिरार्थींना समजावून सांगितले.

              त्यानंतर कलाविष्काराची तयारी करण्यासाठी शिबिरार्थींना वेळ देण्यात आला. रात्री जेवणानंतर तिसऱ्या सत्रात 'खगोलविज्ञान व फलज्योतिष' या विषयावर बोलण्यासाठी डॉ. नितीन शिंदे उपस्थित होते. ग्रहांविषयीचे समज गैरसमज व फलज्योतिषातील फोलपणा त्यांनी विविध उदाहरणं देऊन स्पष्ट केला.

       दुसऱ्या दिवसाची सकाळ मैदानावरील इंजिन इंजिन या अँक्टिव्हिटीने झाली. नाश्ता झाल्यावर पुढील सत्रांना सुरुवात झाली. या सत्रात 'लिंगसमभाव व लैंगिकता' या विषयावर संवाद साधण्यासाठी मिलिंद चव्हाण यांना आमंत्रित केलं होतं. त्यांनी लैंगिकतेचे अनेक पदर उलगडत शिबिरार्थींच्या कुतूहलाचे समाधान केले.

        आरती नाईक यांच्या 'दिल दोस्ती दुनियादारी' या सत्रात सर्वांनीच खूप धमाल धमाल केली. प्रेम आणि आकर्षण यातील फरक त्यांनी अनेक उदाहरणांनी पटवून दिला. 'मानसिक आरोग्य व युवा' या सत्रासाठी डॉ. अनिल डोंगरे उपस्थित होते. त्यांनी युवकाचे वाढते मानसिक ताण तणाव आणि त्यावर घेण्याची काळजी या विषयी संवाद साधला.

       सोशल मीडिया आजच्या युवांचा जिव्हाळ्याचा विषय. या विषयीच्या सत्रात 'सोशल मीडियाचा विवेकी वापर' या विषयी संवाद साधण्यासाठी मुक्ता चैतन्य उपस्थित होत्या. त्यांनी सोशल मीडिया आपला कसा वापर करून घेतं इथपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी फसवणूक होते. या विषयी सविस्तर संवाद साधला. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी 'कलाविष्कार' घेतला गेला. यात सातही गटांनी

       गटचर्चा विषय आणि स्किट विषय विचार तर कराल, लोकशाही,  प्रतीकांच्या अस्मिता, आरक्षण,  शिक्षणाचे भांडवलीकरण, हाताची घडी तोंडावर बोट, लैंगिक शिक्षण अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या विषयांवर नाटक, पथनाट्य सादर केलेत.

           तिसऱ्या दिवसाची सुरुवात दोन अँक्टिव्हिटीने झाली. त्यातून मॉब लिंचिंग, बलात्कार सारख्या गंभीर विषयावर अंतर्मुख करणारा संदेश शिबिरार्थींना मिळाला. सकाळचा नाश्ता झाल्यावर 'धार्मिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता' याविषयी शिबिराथींशी संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा मिलिंद चव्हाण उपस्थित होते. त्यांनी स्वतंत्र भारतातील दहशतवादाचा इतिहास व वर्तमान या विषयी अगदी मार्मिक भाष्य केलं. आणि शेवटच्या सत्रात कृष्णात स्वाती अंनिस ची ओळख आणि अंनिस विषयी पसरलेले समज गैरसमज या विषयी माहिती दिली.

            समारोप सत्रातपत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्या हिनाकौसर खान उपस्थित होत्या. त्यांनी कामगार, शेतकरी आणि स्त्रियांच्या प्रश्नांबाबत शिबिरार्थ्यांशी संवाद साधला. 'आपल्याला मिळालेल्या प्रिव्हिलेजचा योग्य वापर करून स्वतःची प्रगती करत रहावी. तसेच मुलींना नेहमीच कमी संधी मिळत असतात. त्यामुळे त्यांनी आपल्याला मिळालेली प्रत्येक संधी पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न करावा. तसेच तिथेही शक्य असेल तिथे आपण स्वतःच स्वतःसाठी संधी निर्माण करावी.' असा संदेशही त्यांनी दिला. यावेळी अनेक शिबिरार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

             'द सोच' युवा छावणीने नव्या विचारांना चालना देत विवेकाधिष्ठित, समतावादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा महत्त्वाचा प्रयत्न यातून केला. यात सहभागी होऊन युवकांमध्येही नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा संचारली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image