वणी, शुभम कडू :
तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात दिनांक ०१ ते १५ जानेवारी दरम्यान 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. या उपक्रमानुसार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी वणी येथे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय येथे दिनांक ३० डिसेंबर व ३१ डिसेंबर रोजी दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन नुसाबाई चोपणे महाविद्यालय, वणी चे प्राचार्य प्रा. देवाळकर सर आणि प्रा. ताजने सर यांच्या हस्ते करण्यात आले.
वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तीमत्त्वाचे भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते, परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासुन दुरावत चाललेला असल्याचे आढळून येते. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सावित्रीबाई फुले वाचनालय पाऊले उचलत आहे, असे उद्घाटक प्रा. ताजने सर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बाळासाहेब राजूरकर सर, प्रमुख अतिथी प्रा. ढवळे मॅडम, प्रा. तांबे मॅडम आणि प्रभाकरराव मोहीतकर सर उपस्थित होते.
या ग्रंथप्रदर्शनीला विद्यार्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे बहारदार संचालन सचिव प्रा. विजय बोबडे सर, प्रास्ताविक संचालक व्ही.बी. टोंगे सर तर उपस्थितांचे आभार संचालक अनिलकुमार टोंगे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
दि. ०१ ते १६ जानेवारी २०२५ दरम्यान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय येथे वाचक / विद्यार्थी यांच्यासाठी सामूहिक वाचन, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य कार्यशाळा, विद्यार्थी-लेखक परिसंवाद अशा कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
तरीही वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन वाचन संस्कृती वाढवण्यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर सर यांनी केले आहे.








टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या