वणी :
राज्यातील शाळांमध्ये सक्तीने हिंदी शिकवण्याच्या शासन निर्णयाला विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. वणी शहरातील नगर परिषद व खाजगी शाळांतील मुख्याध्यापकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठविले पत्र मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दिले.
यावेळी राज ठाकरे यांनी शाळांसाठी पाठवलेले पत्र देण्यात आले. एप्रिलपासून शिक्षण विभागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला राज्य शासनाने पहिलीपासून तीन भाषा शिकविण्याचा निर्णय घेतला होता. यात मराठी, इंग्रजीसह हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाला तीव्र विरोध केला. जनमत तयार झाल्यानंतर सरकारने माघार घेत हिंदी ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अजूनही या संदर्भात कोणताही लेखी आदेश जाहीर झालेला नाही. दरम्यान, काही शाळांमध्ये तिसर्या भाषेच्या पुस्तकांची छपाई सुरू झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मनसेने शासनावर 'छुप्या मार्गाने भाषा लादण्याचा' आरोप करत विद्यार्थ्यांवर ओझे टाकू नये, अशी भूमिका घेतली आहे. भाषा लादल्यास मराठी भाषेचेच मोठे नुकसान होईल, असे मत व्यक्त करण्यात आले. मनसेचे मत आहे, की विद्यार्थ्यांनी गरजेनुसार मोठेपणी हवी ती भाषा शिकावी, मात्र लहान वयात अनावश्यक ओझे टाकू नये. यासाठी शाळांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे.
अन्यथा, महाराष्ट्र सैनिक चर्चेसाठी शाळांमध्ये येतील, असा इशाराही राज ठाकरे यांनी पत्राद्वारे दिला आहे. या पत्राच्या प्रती सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अन्य शाळांमध्येही मनसेचे पदाधिकारी विभागून भेट देणार आहेत. अंकुश बोढे, अमोल मसेवार, विलास चोखारे, मयूर गेडाम, क्रिष्णा कुकडेजा, योगेश ताडम, जुबेर खान, हिरा गोहोकार, आदी पदाधिकारी पत्र देते वेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या