शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित १७ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वणीच्या मुलींनी दमदार कामगिरी करत जिल्हा विजेतेपद पटकावले. या शानदार विजयासह लायन्स स्कूलचा संघ अमरावती विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
यवतमाळ येथील राणी झाशी मैदानावर २ ऑक्टोबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात लायन्स स्कूलच्या संघाने राणी लक्ष्मीबाई विद्यालय, यवतमाळच्या संघाचा ९ विकेट्सने पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत लायन्स स्कूलच्या खेळाडूंनी संघभावना आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे दर्शन घडविले.
अंतिम सामन्यात कर्णधार स्वरा करंडे, भाविका हेपट आणि अंजली पांडे यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. जिल्हा विजेत्या संघात कर्णधार स्वरा करंडे, भाविका हेपट, अंजली पांडे, मानवी कटारिया, कोमल राजपुरोहित, अनोखी केमेकर, श्रावणी काळे, संबोधी वानखेडे, आराध्या येवले, हर्षदा नित, कंचन गुरनुले, अनुश्री चंद्रगिरीवार, अनन्या राजुलवार, ईशानी हेपट, कुमूद नित आणि मृणाली गोवारदिपे यांचा समावेश आहे.
लायन्स स्कूलचा संघ दुसऱ्यांदा विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक शमीम अहमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, सुनिता खुसपुरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी क्रीडा प्रशिक्षक अविनाश ऊईके, शिक्षिका नेहा शेख आणि विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी संघाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या असून, या स्पर्धेतही लायन्स स्कूलच्या मुली उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

