Type Here to Get Search Results !

लाठीकरांच्या डोळ्यांत पुन्हा उजेडाची आशा; ५१ जणांना मोफत शस्त्रक्रियेचा आधार


 वणी : 


       “दृष्टी वाचवा, जीवन उजळवा” या सामाजिक भावनेतून ॲड राहुल खारकर मित्रपरिवार यांच्या वतीने आज लाठी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात मोफत नेत्र तपासणी व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

      

      या शिबिरासाठी लाठीसह निवली, बेसा, भालर, मंदर आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामध्ये तब्बल १६२ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ५१ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले.


      या सर्व ५१ रुग्णांना दि.९ ऑक्टोबर रोजी महात्मे हॉस्पिटल, नागपूर येथे मोफत नेत्र शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांची ये-जा, राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असून, रुग्णांना आवश्यक मार्गदर्शनही केले जाणार आहे.


      आर्थिक परिस्थितीमुळे डोळ्यांच्या उपचारांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना आधार मिळावा आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश यावा, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम ॲड राहुल खारकर यांनी आपल्या परिसरात घेतला. ५१ नागरिकांच्या डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.


         या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील नागरिकांनीही मोठे सहकार्य केले. यामध्ये पोलिस पाटील संजीवनी खिरटकर, आशा सेविका सुनीता डवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य रीना लाडे, मुकेश खिरटकर, रितेश लाडे, शुभम टोंगे, गुरुदेव सेवा मंडळाचे आशिष माहूरे, नंदू माहूरे, नीलेश करडे, गणेश माहूरे, सागर मोते, ईश्वर माहूरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image