Type Here to Get Search Results !

नगर वाचनालयात अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त डॉ. दिलीप अलोणे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान


 वणी : 


        मराठी भाषेला समृद्ध आणि वैभवशाली साहित्यिक परंपरा लाभली असून, तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी आहे. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून तिचा अभिमान जपला पाहिजे, असे प्रतिपादन लोककलावंत व वक्ते प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांनी केले.

      

      नगर वाचनालय, वणीच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते ‘अभिजात मराठी भाषा’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संचालक अनिल जयस्वाल होते.

        

       डॉ. अलोणे यांनी मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, संत साहित्याची परंपरा, भाषेची वैशिष्ट्ये आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे महत्त्व यावर सविस्तर विवेचन केले. सोप्या, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत त्यांनी मराठी भाषेचे सांस्कृतिक व साहित्यिक वैभव उलगडून दाखविले. मराठी भाषेचे संवर्धन केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष व्यवहारात तिचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी नगर वाचनालयाकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.


         अध्यक्षीय भाषणात अनिल जयस्वाल यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावे, मराठी भाषेचे महत्त्व समजून घ्यावे आणि तिच्या जतनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे आणि राम मेंगावर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, वाचक, साहित्यप्रेमी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अभिजात मराठी भाषेच्या वैभवाची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image