वणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मनसे गरबा महोत्सवा'ची सांगता उत्साही वातावरणात झाली. या रंगारंग महोत्सवात जिल्ह्यातील गरबाप्रेमींनी आणि स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या दर्जेदार नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
अंतिम अटीतटीच्या लढतीत मृण्मयी इंदुरकर हिने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे मानचिन्ह आणि प्रथम विजेतेपदाचा बहुमान पटकावला. तर स्वाती भारसागर हिने द्वितीय क्रमांक पटकावत आकर्षक 'लॅपटॉप' जिंकला, आणि नेहा तातेड हिने तृतीय क्रमांक पटकावून 'टॅब' आपल्या नावावर केला.
या महोत्सवात वयोगटानुसार विजेत्यांवर बक्षिसांची मोठी बरसात करण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी दुचाकी गाडी, द्वितीयसाठी लॅपटॉप, तृतीयसाठी टॅब यांसह स्मार्टफोन, ओव्हन, मौल्यवान वस्तू आणि रोख रकमेची पारितोषिके जाहीर करण्यात आली होती. यामध्ये १६ ते ३० वयोगटात माही ठाकूर, हरप्रित सिंग, अमृता मुसाले, आशा निखार, अर्पित मोहुरले, खुशेर मोहुरले आणि स्नेह प्रेमकुंवर या स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले.
राजू उंबरकर व सौ. तृप्ती उंबरकर यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या भव्य बक्षीस वितरण सोहळ्याला ॲड. कुणाल चोरडिया, डॉ. रोहित चोरडिया, अविनाश भुजबळराव, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख रमेश पेचे, मारेगावच्या नगरसेविका अंजुम शेख, माजी नगराध्यक्ष प्रियाताई लभाणे, बंडू येसेकर, शुभम भोयर, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, मयूर गेडाम, लक्की सोमकुवर, वैभव पुराणकर, जतिन राऊत, मयूर घाटोळे, इरफान सिद्दिकी, निलेश झाडे, गौरव पुराणकर, योगेश तुराणकर, संदीप ठोंबरे, पवन इखारे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मनसेच्या या उपक्रमाला वणीकरांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

