Type Here to Get Search Results !

वाचनाचे संस्कार व्यक्तिमत्त्वाला आकार देतात - सुनील इंदुवामन


 वणी : 


        वाचनामुळे विचारांमध्ये मोठे बदल होतात. वाचनाचे संस्कार व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. त्यामुळे माणसामधील ज्ञानाला धार मिळते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे वाचन अथांग होते. त्या ज्ञानाचा त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उपयोग केला. आपण सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन साहित्यिक, निवेदक तथा वक्ता सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी केले.


        माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळ वाचनालय आणि विवेकानंद प्राथमिक विद्यालय यांच्या वतीने वाचनप्रेरणा दिन साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक धनंजय गाडगे होते. विचारपिठावर शिक्षक अश्विन राठोड, महेश आगलावे आणि दिनेश चकोर उपस्थित होते. 


       प्रमुख वक्ते सुनील इंदुवामन ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. छोट्या छोट्या वाचनापासून सुरुवात करायची सूचना केली. शाळेतच असलेल्या ग्रंथालयाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 


      शिक्षक अश्विन राठोड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माणसाला वाचन क्षणोक्षणी घडवत असते. वाचनाने मनावर संस्कार होतात, असे ते यावेळी म्हणाले. अभ्यासक्रमातील पुस्तकांशिवाय अन्य वाचनही करावयास त्यांनी सांगितले. शिक्षक महेश आगलावे यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची थोडक्यात जीवनगाथा सांगितली. ज्ञानक्षेत्राच्या कक्षा वाढवाव्यात असे सुचवले. 


        कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय गाडगे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे अनेक पैलू समजावून सांगितले. अनेक महामानवांनी वाचनातून किती मोठी क्रांती केली, ते पटवून दिले. स्मार्टफोन आणि कम्प्युटरच्या जमान्यातही हातातलं पुस्तक बाजूला ठेवू नका अशी कळकळीची विनंती केली. रामकृष्ण विवेकानंद मंडळ वाचनालय वर्षभर निरंतर उपक्रम घेत असते. त्यातील वाचनप्रेरणा दिवस हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे ग्रंथपाल सुरेंद्र विधाते यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. 


       यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विशिष्ट काळ वचन केले. त्यानंतर सुनील इंदुवामन ठाकरे यांच्या हस्ते रामकृष्ण मंडळ वाचनालयात लागलेल्या ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल सुरेंद्र विधाते यांनी केले. तर आभार अमोल पेटकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image